पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रभाग 20 मधील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी केली आहे. या संदर्भात पगडे यांनी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे.
पगडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पनवेल शहरातील प्रभाग क्रमांक 20 अंतर्गत तक्का गाव व कॉलनी परिसर असून या भागातील नागरी लोकसंख्या जवळपास 20 हजार आहे. पनवेल महानगरपालिकेस या भागातून मिळणारे प्रॉपर्टी टॅक्सचे प्रमाण मोठे आहे. पनवेल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकाकडे जाणारे प्रमुख महत्त्वाचे रस्ते आहेत. रोज हजारो नागरिक या रस्त्यांवरून ये-जा करीत असून ट्रक, जीप, बस, रिक्षा, टू व्हीलर इत्यादी वाहनांची वर्दळही मोठ्या स्वरूपात आहे. रस्त्यांची अवस्था खराब असल्यामुळे या रस्त्यांचे काँक्रीटीकरण व्हावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
यामध्ये तक्का गाव मुख्य रस्ता ते तक्का दग्र्यापर्यंत 40 फुटी रस्ता, मुंबई- पुणे हायवे ते साईबाबा मंदिर रोड ते पनवेल रेल्वे स्थानक चौकापर्यंत 40 फुटी रस्ता, मोराज रिक्षा स्टॅन्ड ते मोराज कॉलनी ते नॅशनल पार्क ते नॅशनल गार्डन ते कस्तुरी सोसायटीपर्यंत 30 फुटी रस्ता, तसेच प्रजापती सोसायटी ते चॅनेल रेसीडेन्सी 40 फुटी रस्ता डांबरीकरण करावे, असे निवेदनात नमूद केले आहे.