कर्जत : बातमीदार


तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील भगताचीवाडीच्या दोन लहान आदिवासी वाड्यांत असलेले पाणी साठे आटले आहेत. डवर्याचे पाणी पिणारे हे आदिवासी आता आश्रमशाळेच्या मागे असलेल्या नदीवर जाऊन पाणी आणत आहेत.
मोग्रज ग्रामपंचायतीमध्ये शासनाची आदिवासी आश्रमशाळा असून, त्या अलीकडे फणसवाडी ही 20 घरांची वस्ती आहे. तेथे अद्याप कोणतीही पाणीपुरवठा योजना पोहचली नाही. फणसवाडीजवळ असलेल्या टेकडीखाली एक पाण्याचा झरा आहे. या झर्याचे पाणी आटले की आदिवासी महिला फणसवाडीमधून पायी निघतात आणि शासकीय आश्रमशाळेच्या मागे असलेल्या ओहोळावर खड्डे खोदून पाण्याचा शोध घेतात. उन्हाळ्यात या ओहोळात असंख्य डवरे खोदलेले दिसून येत आहेत. वाडीपासून ओहोळपर्यंतचे अंतर दीड किलोमीटरचे असून, नाईलाज म्हणून हे आदिवासी लोक ही पायपीट वर्षानुवर्षे करीत आहेत.
या दोन वाड्यांमध्ये पिण्याची पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी त्या झर्याच्या ठिकाणी आदिवासी उपयोजना कार्यालयाकडून विहीर मंजूर झाली आहे, त्यास किमान वर्षाचा कालावधी लोटला आहे. विहिर खोदावी लागणार त्या ठिकाणाची जमीन शेजारी असलेल्या धोत्रे गावातील व्यक्तीची आहे तर फणसवाडीमधून त्या विहिरीवर पोहचण्यासाठी असलेल्या रस्त्याची जमीन ही पिंगळस येथील व्यक्तीची आहे. ते दोन्ही शेतकरी आपल्या जमिनीचा भाग देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे विहीर मंजूर असूनही ती बांधून पूर्ण होत नाही. परिणामी दोन्ही वाड्यांमधील उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई कमी होत नाही.
दरम्यान, वाडीमध्ये लवकरच पाणी येईल, अशी खात्री असल्याने आदिवासी ग्रामस्थांनी तेथे अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स या संस्थेकडून पाणी साठवण टाक्या बांधून घेतल्या आहेत. पण त्या टाक्यांत अद्याप पाण्याचा थेंब पोहचला नाही.
आमची दुसरी पिढी ज्या झर्याचे पाणी पिऊन आयुष्य जगते, त्या ठिकाणी विहीर बांधून झाली तर आमच्या दोन्ही वाड्यांतील पाणीटंचाई किमान 20 वर्षांसाठी संपून जाईल.
-वामन भगत,
आदिवासी ग्रामस्थ, फणसवाडी, ता. कर्जत
विहीर बांधण्यासाठी जमीन मिळावी, याकरिता ग्रामपंचायत पुढाकार घेणार असून, त्यातील एक जमीन मालक हा दुसर्या ग्रामपंचायतीमधील आहे. मात्र ग्रामपंचायत भागात सर्व ठिकाणी पाणीटंचाई असून, शासकीय टँकर सुरू झाल्यावर त्यातून फणसवाडीला पाणीपुरवठा करून तेथील पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न आहे.
-विलास भला,
उपसरपंच, मोग्रज ग्रामपंचायत, ता. कर्जत