शिर्डी : प्रतिनिधी
शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपने झेंडा रोवला आहे. केवळ तीन नगरसेवक असतानाही भाजपला नगराध्यक्षपदाची खुर्ची मिळाली. भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील समर्थक जगन्नाथ गोंदकर यांनी अर्ज माघारी घेतल्याने शिवाजी गोंदकर नगराध्यक्षपदी विराजमान झाले.
शिर्डी नगरपंचायतीत राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व आहे. नगरपंचायतीत एकूण 17 पैकी अवघे तीन नगरसेवक भाजपचे आहेत. मात्र राधाकृष्ण विखे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आल्यावरही काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले विखे समर्थक नगरसेवक भाजपच्या पाठीशी होते. राधाकृष्ण विखेंच्या गटातील नगरसेवकांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आणि जगन्नाथ गोंदकर यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे नगराध्यक्षपदाचे स्वप्न साकार झाले.
अहमदनगर जिल्ह्यातील ‘प्रवरा पॅटर्न’ नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. शिर्डी नगरपंतायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीतही प्रवरा पॅटर्न नगराध्यपदी कोणाची वर्णी लावणार, याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागले होते.
माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नगरपंचायतीवर वरचष्मा राहिला आहे. पाच वर्षांच्या कालावधीत अडीच वर्ष एकाला तर सव्वा-सव्वा वर्ष अन्य उमेदवाराला संधी देण्याचा प्रवरा पॅटर्न प्रसिद्ध आहे. 2014 च्या नगरपंचायत निवडणुकीत विखे पॅनलचे 10, भाजपचे 03, शिवसेना आणि मनसेचे प्रत्येकी एक, तर दोन अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत.
विखे पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर हे संख्याबळ 10 वरुन 13 असे झाले. विखे समर्थकांतून जगन्नाथ गोंदकर, भाजपचे नगरसेवक शिवाजी गोंदकर आणि शिवसेनेच्या अनिता जगताप यांच्यात चुरस होती. मात्र भाजपच्या उमेदवारालाच खुर्ची मिळाली आहे.