नियमांचे पालन करण्याच्या पोलिसांकडून सूचना
पनवेल : वार्ताहर
पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी नुकतीच फार्महाऊस चालक आणि मालक यांची बैठक आयोजित केली होती. या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना दौंडकर यांनी फार्महाऊस चालकांना दिल्या.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध अधिनियम, 1897 लागू करण्यात आलेला असून, यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमास बंदी केलेली आहे. पनवेल तालुक्यातील फार्महाऊस, रिसॉर्ट, रेस्टॉरंट अगर शेतावर वेगवेगळया कार्यक्रमासाठी मालक आपली जागा भाडेतत्वावर देत असल्याबाबत पोलिसांना माहिती प्राप्त झाली. त्यामुळे पनवेलच्या फार्महाऊस चालकाना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.
दौंडकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये फार्महाऊस चालकांना शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध असून मुंबई, पुणे, ठाणे या सारख्या महानगराच्या नजीक असल्याने खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक हे रायगड जिल्हात येत असतात. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा निर्गमित केलेली आहे. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे अशा प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन केल्यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून वारंवार फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन 1973 कलम 144 (1) (3) प्रमाणे मनाई आदेश जारी करण्यात येत आहेत.
पनवेल परिसरात मालकीच्या फार्महाऊस, रिसॉर्ट, रेस्टॉरंट व शेतावर येणारे नागरीक कुटुबांसह, नातेवाईक, मित्रपरिवार हे जवळील पाण्याचे धरण, नदी व धबधबे येथील पाण्यात आनंद लुटण्यासाठी मद्यप्राशन करून जात असतात. तसेच डोंगर किल्ल्यांवर ट्रॅकिंगसाठी जात असतात. परंतू डोंगरभागात पडणार्या पावसाचा अंदाज न आल्याने पाण्यात पडून वाहून, बुडून व रस्ता चुकून खाली पडून अपघात होण्याच्या घटना वारंवार होत असतात. तरी असा कोणाच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील, तसेच सहभागी होणार्या लोकांच्या जिवीतास कोणत्याही प्रकारे धोका होणार नाही याची संपुर्ण जबाबदारी फार्महाऊस, रिसॉर्ट, रेस्टॉरंट मालक चालकानी घ्यावी असे पोलिसांनी बजावले आहे.
आनंद साजरा करत असताना कोणत्याही प्रकारे जुगार खेळताना अगर दारूचे अथवा ड्रग्जचे सेवन करताना मिळून आल्यास अथवा डिजे, लाऊडस्पिकर लावून मोठ्याने गोंगाट करून आजूबाजूच्या लोकांना उपद्रव करीत असल्याचे मिळून आल्यास संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यानी सांगितले.