Breaking News

कोरोना काळानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला वेग -नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

कोरोनाच्या कठीण काळानंतर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने वाढ होत आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला आता आशा आहे. नुकतेच एका जागतिक संस्थेनेसुद्धा म्हटले की, भारत पुन्हा एकदा जगातील वेगाने पुढे जाणारी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त  केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि. 15) व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गुजरातमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. सूरतमधील सौराष्ट्र पटेल सेवा समाजाकडून उभारण्यात येणार्‍या हॉस्टेलचे भूमिपूजन त्यांनी केले. यानिमित्ताने भारतीय अर्थव्यवस्थेवर पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, स्टार्टअप इंडियाचे यश आपल्या सर्वांसमोर आहे. आज भारतातील स्टार्टअप संपूर्ण जगात नाव कमवत आहेत. कोरोनाच्या कठीण काळानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेने एवढ्या वेगाने उभारी घेतली आहे की संपूर्ण जग आशेने भारताकडे बघत आहे. एका जागतिक संस्थेनेही असे म्हटले आहे की पुन्हा एकदा भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा उल्लेख करताना मोदींनी म्हटले की, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात व्यावसायिक अभ्यासक्रम हे प्रादेशिक भाषेत शिकण्याचा पर्याय आहे. आता शिक्षण म्हणजे फक्त डिग्री नाही, तर शिक्षणाला कौशल्याशी जोडले जात आहे. देश आपल्या परंपरागत कौशल्यांना आता अधुनिक तंत्रज्ञानाशी जोडत आहे. सबका साथ, सबका विकास हा नारा किती शक्तिशाली आहे हेसुद्धा मोदींनी या वेळी सांगितले. मोदी म्हणाले की, सबका साथ, सबका विकास आणि त्यात असलेली ताकद ही मी गुजरातमधूनच शिकलो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, जातीच्या राजकारणाचा पाठिंबा नसताना गुजरातच्या सेवेची संधी मिळाली. तुमच्या आशीर्वादाची ताकद इतकी मोठी आहे की, आज 20 वर्षे झाली अखंडपणे आधी गुजरातची आणि आता देशाची सेवा करण्यास मिळाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुजरातचे नवनियुक्त मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे जोरदार कौतुक मोदी यांनी केले. विविध तंत्रज्ञानाची माहिती असलेले भूपेंद्र हे आजही जमिनीवर आहेत. ते आजही कुठल्या वादात अडकले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुजरात आणखी विकास करेल, असा विश्वास मोदी यांनी या वेळी व्यक्त केला.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply