लहुळसे येथील शेतकर्यांनी घेतले भातापेक्षा चौपट उत्पन्न
पोलादपूर : प्रतिनिधी
पारंपरिक भात पिकाला पर्यायी पीक म्हणून पोलादपूर तालुक्यातील लहुळसे येथील दोन प्रगतीशील शेतकर्यांनी खरीप हंगामात आपल्या शेतात मोरणा व वारणा जातीच्या भुईमूग बियाण्याची लागवड करुन एकरी 10 क्विंटल उत्पन्न घेतले आहे.
भात पिकाबरोबर शेतकर्यांनी भुईमूग पिकाची लागवड करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यलयामार्फत करण्यात आलेे होते. त्याला प्रतिसाद देत लहुळसे येथील शेतकरी विठोबा रामजी रिंगे व विजय गंगाराम रिंगे यांनी खरीप हंगामात तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली अकोला येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या मोरणा व वारणा जातीच्या भुईमूग बियाण्याची लागवड केली होती. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. रिंगे यांनी भुईमूगाचे एकरी 10 क्विंटल उत्पन्न आहे. ते उत्पन्न भाताच्या चौपट आहे.
पोलादपूर तालुक्यातील शेतकर्यांनी डिसेंबर अखेर भुईमुगाची लागवड केली तर खरीप हंगामापेक्षाही जास्त उत्पन्न मिळेल, असा विश्वास तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांनी व्यक्त केला आहे.
लहुळसेेतील शेतकरी रिंगे यांच्याकडे भूईमुगाचे मोरणा व वारणा या जातीचे 20 क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. ते घेऊन अन्य शेतकर्यांनीही आपल्या शेतात भुईमुगाची लागवड करावी, असे आवाहन तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.