Breaking News

नवी मुंबईत कोरोनाचे एक हजार मृत्यू

434 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई शहरात कोरोनाबाधितांचा आकडा हा पन्नास हजारांच्या घरात गेला असून कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या ही एक हजार इतकी झाली आहे. सध्या 434 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असून कोरोनामुक्तीचा दर 95 टक्केपर्यंत गेला आहे.

दिवाळीपूर्वी शहरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली होती. दिवसाला तीनशे ते चारशेच्या घरात असलेली रुग्णसंख्या शंभरच्या खाली आली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहरातील अनेक काळजी केंद्रे बंद केली होती. अत्यवस्थ रुग्णही कमी झाल्याने अतिदक्षता व कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटा वाढविण्याचे नियोजन पुढे ढकलले होते. मात्र दिवाळीत नागरिकांच्या बेफिकिरीमुळे दिवाळीनंतर कोरोनाबाधितांत वाढ झाली होती. तीही आता कमी झाली आहे. मात्र मृतांचा आकडा एक हजार झाला आहे.

वाशीमध्ये आलेल्या फिलीपाईन्स नागरिकाला 13 मार्चला कोरोनाची लागण झाली व नवी मुंबईमधील प्रादुर्भावास सुरुवात झाली. कोरोना झालेल्या पहिल्या रुग्णाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला व नागरिकांमध्ये या आजाराविषयी भीती निर्माण झाली. सुरुवातीला धीम्या गतीने कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, परंतु जूनअखेरपासून वेगाने शहरभर कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी, कामगार व इतर घटकांनाही कोरोनाची लागण झाल्यानंतर काही व्यापार्‍यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भाजी मार्केटमधील 27 वर्षांच्या तरुण व्यापार्‍याचाही मृत्यू झाला. शहरातील मृत्युदर वाढून साडेतीन टक्के झाला. प्रत्येक विभागातील कोरोना बळींचा आकडा वाढू लागला. सीवूडमध्ये डॉक्टर व त्याच्या पत्नीचाही मृत्यू झाला. 270 दिवसांमध्ये कोरोना बळींचा आकडा एक हजारवर गेला आहे.

सर्वाधिक 154 बळी ऐरोलीमध्ये गेले आहेत. सर्वात कमी 44 जणांचा दिघा परिसरात मृत्यू झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्यूची टक्केवारी सर्वात जास्त आहे. 60 ते 70 वयोगटातील 292 व 50 ते 60 वयोगटातील 264 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब व इतर सहव्याधींचे प्रमाण जास्त असल्यामुळे कोराना झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. 20 ते 60 या वयोगटातील नागरिकांना नोकरी, व्यवसायासाठी वारंवार घराबाहेर पडावे लागत असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे.

महानगरपालिकेने शून्य मृत्युदराचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जुलैमध्ये साडेतीन टक्क्यांवर मृत्युदर गेला होता. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी मृत्युदर कमी करण्यावर विशेष लक्ष दिले व ते प्रमाण 2 टक्क्यांवर आणले. हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू केले आहेत.

ऐरोलीेमध्ये सर्वाधिक बळी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईमध्ये 270 दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. या कालावधीमध्ये एकूण रुग्णसंख्या 49 हजारपेक्षा जास्त झाली आहे. कोरोना बळींचा आकडा एक हजार झाला असून ऐरोलीमध्ये सर्वाधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 60 ते 70 वयोगटात मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

ज्येष्ठ, बालकांची काळजी घेण्याचे आवाहन

कोरोनामुळे शहरात मृत्यू झाला नाही, असा सुरुवातीची काही दिवस वगळता एकही दिवस गेला नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाला करोना मृत्यूबाबत आणखी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यात इतर आजार असलेले व त्यांना कोरोना झाला अशांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घरातील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.

Check Also

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 …

Leave a Reply