Breaking News

अंगारकीला बल्लाळेश्वर, महडचे गणपती मंदिर बंद

भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन

पाली, खोपोली ः प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सूचनेनुसार पालीसह जिल्ह्यात कोरोना नियमांची अंमलबजावणी सुरू आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील अष्टविनायक देवस्थानांपैकी प्रख्यात असलेले धार्मिक स्थळ पालीचे बल्लाळेश्वर मंदिर तसेच महड येथील वरद विनायकाचे मंदिर अंगारकी चतुर्थीला मंगळवारी (दि. 2) भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे.
मंगळवारी अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद राहणार असल्याची माहिती बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय धारप यांनी रविवारी (दि. 28) दिली. पालीतील प्रसिद्ध बल्लाळेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची नेहमीच मोठी गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी मंगळवारी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्या संयुक्त बैठकीत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय झाला. या वेळी भाविक व भक्तगणांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, तसेच बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टला पुरेपूर सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय धारप यांनी केले आहे.
दरम्यान, अंगारकी चतुर्थीला होणारी गर्दी टाळण्यासाठी महड येथील वरदविनायकाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला. खालापुरात अष्टविनायकापैकी एक वरदविनायक मंदिर आहे. येथे लाखो भाविक दर्शनाला येत असल्याने कोरोना नियमांचे पालन होणे अवघड असल्याने देवस्थान समितीने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अंगारकीच्या आदल्या रात्री सोमवारी 1 मार्चला रात्री 11 ते मंगळवार 2 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत संस्थानने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. अंगारकी चतुर्थीला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने गर्दी टाळण्यासाठी मंदिर एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, भाविकांनी सहकार्य करावे.
-मोहिनी वैद्य, कार्याध्यक्ष श्री गणपती संस्थान, महड

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply