कर्जत : बातमीदार
मातीचा पोत कायम राखण्यासाठी शेतकर्यांनी जमिनीला आपले मानून जमिनीचा पोत राखण्याचे आव्हान स्वतःहून स्वीकारावे, असे आवाहन ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ अरविंद सुळे यांनी येथे केले.
जागतिक मृदा दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी कशेळे अंतर्गत माले, कळंब, अंजप आणि वाकस या कार्यक्षेत्रात कृषी सहाय्यक विजय गंगावणे, महेश बाबर, स्वाती आवाळे, किरण गंगावणे आणि गुणवंत पाटील यांनी विविध कार्यक्रम राबविले. त्यात माती परिक्षण महत्त्व व माती निर्मिती या विषयावर फार्मेक्स कृषीचे विषयतज्ज्ञ अरविंद सुळे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व ऑरगँनिक कार्बन मात्रा वाढवण्यासाठी शेतकर्यांनी गांडूळ खताचा उपयोग करावा, असा सल्ला कृषी पर्यवेक्षक सचिन केने यांनी या वेळी दिला. परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी प्रवीण जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.