Breaking News

मांडला ते काकळघर रस्त्याची दुरवस्था; जनआंदोलनाचा इशारा

रेवदंडा : प्रतिनिधी

जागोजागी खड्डे पडल्याने मांडला ते काकळघर या रस्त्याची पुरती दुरावस्था झाली असून, येत्या पंधरा दिवसात या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करा, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मांडला व काकळघर ग्रामपंचायतींच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. मांडला ते काकळघर दरम्यान या रस्त्यावर सात गावे व आदिवासी वाड्या आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डेे पडले असून, या रस्त्याने नेहमी प्रवास करणार्‍यांना मणक्याचे दुखणे, व इतर आजार जडले आहेत. विशेषत: रूग्ण व गरोदर महिलांना या रस्त्याने वाहनांतून नेताना भयकंर त्रास सहन करावा लागतो. मांडले-महाळुंगे ते काकळघर रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 2018-19मध्ये दोन कोटी नऊ लाख 44हजार 498रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या कामाची निविदा 7मार्च 2919 रोजी काढण्यात आली होती. ठेकेदाराला कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे. मात्र अद्यापही या कामास सुरूवात झालेली नाही, निवेदनात म्हटले आहे. मांडले-महाळुंगे ते काकळघर रस्त्याचे मंजूर झालेले काम येत्या पंधरा दिवसात सुरू करावे, अन्यथा जनआंदोनल करण्यात येईल, असा इशारा मांडला व काकळघर ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. हे निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याचे अलिबाग येथील कार्यकारी अंभियंत्यांस देण्यात आले. यावेळी मांडला ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता पालवणकर, माजी सरपंच शैलेश रातवडकर, उपसरपंच राजेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य बशीर गोरमे, मंगेश कुळवे, मुस्लिम समाज अध्यक्ष सईद पंचुलकर, अजगर दळवी, काकळघर ग्रामपंचायत सदस्य वैभव वादळ, माजी सरपंच साक्षी गायकवाड, सामाजीक कार्यकर्ते सतेज ठाकूर, गणेश ठाकूर आदी उपस्थित होते. येत्या पंधरा दिवसांत मांडला ते काकळघर रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी उपअभियंत्यांनी या वेळी दिले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply