Breaking News

कोरोनासंदर्भात पनवेल मनपाची आढावा बैठक; लशीच्या पूर्वतयारीबद्दलही चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 10) पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची पहिल्यांदा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोनासंदर्भात महापालिकेने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच कोरोनाच्या लशीसंदर्भात काय पूर्वतयारी करायला हवी याबद्दल लोकप्रतिनिधींनी आपली मते व्यक्त केली.
पनवेल महापालिका हद्दीत दिवाळीनंतर कोविड रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनामार्फत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणकोणती उपाययोजना व तयारी करण्यात आली आहे आणि कशा प्रकारे व किती कोविड सेंटर सुरू करण्यात आले तसेच कोविड 19च्या लसीकरणाच्या नियोजनाबाबत कोणती उपाययोजना केली याची माहिती मिळण्याबाबत बैठक आयोजित करण्यात यावी या आशयाचे निवेदन स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी यांनी नुकतेच आयुक्तांना दिले होते. त्यानुसार महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, उपायुक्त संजय शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी आदी उपस्थित होते.
या बैठकीत कोरोनासंदर्भात पनवेल महापालिकेने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच कोरोनाच्या लशीसंदर्भात पूर्वतयारी काय करायला हवी याबद्दल चर्चा करण्यात आली. या वेळी लोकप्रतिनिधींनी आपली मते व्यक्त केली. पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस आरोग्य विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना, खासगी रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी यांना देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. गोसावी यांनी दिली. पत्रकारांना कोरोनावरील लस प्राधान्याने मिळावी, अशी मागणी या वेळी पनवेल मीडिया प्रेस क्लबतर्फे महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्याकडे करण्यात आली.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply