उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील खोपटा-कोप्रोलीदरम्यान असलेल्या नाल्यात शुक्रवारी पहाटे मोठ्या प्रमाणात घाण आणि उग्र वासाचे केमिकल कुणीतरी सोडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडले आहेत. या सोडलेल्या केमिकलमुळे आजूबाजूची शेती नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे केमिकल बाजूला असलेल्या ग्लोबीकॉन कंटेनर यार्डमधून त्यांच्या वेस्ट वॉटर प्रकल्पातून सोडले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सत्यवान भगत यांनी केला आहे. या संदर्भात महसूल व प्रदूषण नियंत्रण मंडळाला फोन करून तक्रार केल्यावर महसूलचे कोप्रोली सजेचे तलाठी भाऊसाहेब पिरकर आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जेएनपीटी विभागाचे जनसंपर्क अधिकारी किशोर केर्लेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन केमिकल युक्त पाण्याचे नमुने घेतले. परंतु या नाल्यात ठिकठिकाणी मासेही मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे. ते मृत मासे मात्र निरीक्षणासाठी नेले नसल्याची बाब या निमित्ताने समोर आली आहे. त्याचबरोबर ग्लोबीकॉनच्या ज्या चेंबरमधून हे केमिकलयुक्त पाणी नाल्यात आले त्याचीही स्थळ तपासणी केली आहे. त्यामुळे आता अधिकारी वर्ग या कंपनीवर कोणत्या प्रकारची कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तक्रारकर्ते सत्यवान भगत यांनी प्रदुषित पाण्याचे नमुने घेतले असून ते खाजगी लॅबमधून या पाण्याची तपासणी करणार असल्याचे बोलताना सांगितले. या वेळी सत्यवान भगत यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे ग्लोबीकॉन कंपनीचे एचआर मॅनेजर विशाल गावंड यांनी स्वतः तक्रारदारांच्यासोबत प्रकल्पाच्या बाहेर येऊन स्थळ पाहणी केली. या वेळी कंपनीच्या बाहेरच्या भागात जायला कोणताही रस्ताच सध्याच्या घडीला अस्तित्वात नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली आहे. ज्या ठिकाणी हे पाणी सोडले जात आहे तेथे जाण्यासाठी दुसर्या कंपनीच्या आवारातून जावे लागत असल्याचे व नंतर पाणी निचर्याच्या नाल्यावर लाकडी फळी टाकून त्याद्वारे पलीकडे जावे लागल्याची घटना समोर आली आहे.
-दोशींवर कारवाई करण्याची मागणी
बांधपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा ठाकूर यांनीही आपले सहकारी ग्रामपंचायत सदस्य संदेश म्हात्रे, देवानंद पाटील, अच्युत ठाकूर आणि पती प्रशांत ठाकूर यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. प्रशासनाने हे केमिकल या ठिकाणी कुठून आले याची सखोल चौकशी करून दोशींवर कारवाई करावी, अशी मागणी बोलतांना केली आहे.
नाला झाला काळा ठिक्कर
शुक्रवारी सकाळी पहाटेपासूनच ग्लोबीकॉन कंपनीच्या आऊटलेटमधून मोठ्या प्रमाणात केमिकल युक्त पाणी सोडण्यात आल्याने खोपटा कोप्रोली दरम्यानचा पावसाळी पाणी निचर्याचा नाला पुर्णतः काळा ठिक्कर पडला असल्याचे दिसून आले आहे.