श्रीवर्धन ः प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बर्यापैकी पर्यटक येऊ लागले आहेत. येथील समुद्रकिनारी घोड्यावरची राइड किंवा घोडागाडी चालवणार्यांचे अनेक घोडे आहेत. दिवसभर घोडागाडी किंवा घोड्याची राइड करून पैसे कमावल्यानंतर घोडे मोकाट सोडून सदरचे मालक घरी निघून जातात. परिणामी या मोकाट घोड्यांचा त्रास समुद्रकिनारी असलेल्या शेतकर्यांना तसेच रिसॉर्ट मालकांना होत आहे. नुकतीच समुद्रकिनारी असलेली भातशेती कापून झाली. भातशेती कापणीनंतर शेतकर्यांनी पुन्हा तेथे नांगरणी करून मूग, उडीद, वाल, चवळी यांसारखी कडधान्ये पेरली आहेत. ती चांगल्या प्रकारे उगवलीही आहेत, परंतु मोकाट घोड्यांचे कळप येथे येऊन शेतीचे नुकसान करीत आहेत. शेतीच्या कुंपणावरून उड्या मारून घोडे आत जाऊन शेतकर्यांची पिके फस्त करतात. श्रीवर्धन समुद्रकिनारी अनेक रिसॉर्टही आहेत. तेथेही बगीचा तसेच इतर झाडांची लागवड केली आहे. त्या ठिकाणीही मोकाट घोडे घुसून नुकसान करतात. याबाबत श्रीवर्धन नगर परिषदेकडे अनेक वेळा मोकाट घोड्यांबाबत तक्रार करूनही नगर परिषद प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाही. मोकाट घोडे पकडण्यासाठी नगर परिषदेच्या कर्मचार्यांनाही पाठविले जात नाही. मोकाट घोड्यांचे मालक श्रीवर्धन शहराला लागूनच असलेल्या आराठी ग्रामपंचायत हद्दीतील मेटकर्णी परिसरातील आहेत. घोडे मालकांना दिवसभर धंदा करूनही आपल्या घोड्यांना खाऊ घालता येत नसेल तर त्यांनी धंदे करू नयेत, असे स्पष्ट मत शेतकरी व रिसॉर्ट मालक व्यक्त करीत आहेत. परिणामी श्रीवर्धन नगर परिषद प्रशासनाने घोडे मालकांना समज देऊन हा त्रास दूर करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.