Breaking News

म्युकरमायकोसिसचा रायगडात पहिला बळी

पनवेलमध्ये एक रुग्णाचा मृत्यू

अलिबाग ः प्रतिनिधी
कोरोना संकट घोंघावत असतानाच रायगड जिल्ह्यातही आता म्युकरमायकोसिसचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यात या आजाराचे तीन रुग्ण आढळून असून यामध्ये पनवेलमधील दोन आणि खोपोलीतील एकाचा समावेश आहे. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात या आजाराचा हा पहिला बळी ठरला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. या आजारावरील अँपोतेरिसीन बी इंजेक्शनचा 70 एवढा साठा जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. नागरिकांनी स्वतःची नीटनेटकी स्वच्छता ठेवावी, असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव अजून सुरूच असून रुग्णसंख्या हळूहळू कमी होत आहे, मात्र त्यासोबत आता म्युकरमायकोसिस महामारी डोके वर काढत आहे. राज्यात म्युकरमायकोसिसचा झपाट्याने प्रसार सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यातही आता तीन जणांना म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात पनवेल महापालिका हद्दीतील दोन आणि खोपोली येथील एक रुग्णाचा समावेश आहे. तिघांवरही पनवेल महापालिका रुग्णालयात उपचार सुरू होते. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
म्युकरमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार असून, कोरोनातून बर्‍या झालेल्या रुग्णामध्ये याचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने मधुमेहाने आजारी असलेल्या रुग्णांना याची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोना लागण झालेल्या रुग्णांनी वा नातेवाइकांनी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आपल्याला असलेल्या इतर आजाराची पूर्ण माहिती देणे गरजेचे आहे, जेणेकरून डॉक्टर त्या अनुषंगाने उपचार सुरू करून म्युकरमायकोसिस आजाराची लागण होण्यापासून बचाव होऊ शकतो, तसेच नागरिकांनी स्वतःची स्वच्छता नीटनेटकी ठेवावी, कापडी मास्क वापरल्यानंतर त्याचा पुन्हा वापर करताना तो पूर्ण कोरडा झाल्यानंतरच वापरावा, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सूचित केले आहे.
आरोग्य यंत्रणा सतर्क
रायगड जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या आजाराचा शिरकाव झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी नवीन कोविड सेंटरमध्ये स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाची लागण झालेल्या मधुमेह तसेच इतर गंभीर आजार असलेल्या सर्व रुग्णांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले असून लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply