Monday , February 6 2023

रायगड जिल्ह्यात वाहनविक्रीत घट

अलिबाग : प्रतिनिधी

करोनाचा प्रादूर्भाव आणि टाळेबंदी याचा फटका रायगडातील वाहन विक्री व्यवसायाला बसला आहे. जिल्ह्यात गेल्या दिड वर्षात वाहन विक्रीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे वाहन विक्रीतून जमा होणार्‍या महसुलातही  घट झाली आहे. रायगड जिल्ह्यात पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत वाहनांची नोंदणी केली जाते. दरवर्षी साधारणपणे 27 ते 28 हजार नवीन वाहनांची नोंदणी या कार्यालया मार्फत केली जाते. मात्र करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध याचा फटका जिल्ह्यातील वाहन खरेदीला बसला असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दिड वर्षात वाहन विक्रीत मोठी घट झाली आहे. पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत रायगड जिल्ह्यात 2018- 2019 या वर्षात 27 हजार 317 नवीन वाहनांची नोंदणी झाली होती. 2019-2020 मध्ये 25 हजार 510 वाहनांची नोंद करण्यात आली. 2020 मध्ये राज्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला, त्यामुळे टाळेबंदी जाहीर झाली. याचा फटका वाहन विक्रीला बसला. त्यामुळे 2020-21 मध्ये केवळ 18 हजार 187 नव्या वाहनांची नोंदणी झाली. 2021- 2022 या आर्थिक वर्षातही वाहन विक्रीवर मंदीचे सावट कायम आहे. एप्रिल 21 ते ऑगस्ट 21 या पाच महिन्यात सहा हजार 396 वाहनांची नोंद करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने शहरी भागातील ग्राहकांचा वाहन खरेदीकडे कल असल्याचे दिसून आले. पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या दिड वर्षात वाहन विक्री वाढल्याचे दिसून आले होते. मात्र पेणमध्ये वाहन विक्री मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच ग्रामिण भागात वाहन खरेदीला खीळ बसल्याचे दिसून येत आहे. वाहन विक्री घटल्याने यातून मिळणार्‍या महसुलातही घट झाली आहे.

पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणीचा तपशील

वर्ष   :   वाहन नोंदणी          

2018-19 : 27317

2019-20 : 25510

2020-21 : 18187 2021-22 : 6396 (ऑगस्ट अखेर पर्यंत)

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply