Breaking News

हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी

शेतकर्‍यांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सोमवार (दि. 14)पासून सुरुवात झाली. अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. शेतकर्‍यांपर्यंत न पोहोचलेली मदत, मराठा, ओबीसी समाजाचे प्रश्न आदी विषयांवर विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. देशात, जगात काय चाललंय यापेक्षा इथल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या का? महाराष्ट्रात काय दिवे लावले ते बोला, असा सवाल करीत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
पूर आणि वादळग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळावी यासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी विधान भवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. या वेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर सभागृहातही हा मुद्दा उपस्थित झाला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, या सरकारने फक्त एक दिवसाचे अधिवेशन घेतले असून, 10 विधेयके दाखवली आहेत. शेतकर्‍यांना न्याय मिळू नये, मराठा-ओबीसी समाजाचे प्रश्न ऐरणीवर येऊ नये यासाठी हे सरकार चर्चेपासून पळ काढतेय. चर्चा करायची नाही आणि वेळ मारुन न्यायची ही या सरकारची भूमिका आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळू नये ही सरकारची भूमिका आहे.
देशात काय चालेल आहे, जगात काय झाले त्याच्ूयावर हे बोलतात, पण महाराष्ट्रावर बोलले तर उघडे पडतात. तुम्ही शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन 25 ते 50 हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र वास्तवात एक फुटकी कवडीसुद्धा दिली नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला.
कोरोना काळात सरकारी बंगल्यांच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, बंगल्यांच्या नूतनीकरणाची कामे सुरू असतात. बंगल्यांच्या नूतनीकरणावरील खर्च कमीत कमी पैशात झाला पाहिजे, पण आधी शेतकर्‍यांना मदत करायला हवी. या सरकारकडे बंगल्यांवर खर्च करायला पैसा आहे, मग शेतकर्‍यांना द्यायला पैसा का नाही, असा सवाल फडणवीस यांनी केला.
काही बंगल्यांची पाणीपट्टी थकलीय या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील विषय आहे. पीडब्ल्यूडीने योग्य ती माहिती घेऊन योग्य ती कारवाई करावी.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply