कर्जत : बातमीदार
निसर्ग चक्रीवादळात कर्जत तालुक्यातील प्राथमिक शाळा आणि आरोग्य उपकेंद्रांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र त्याकडे बघायला कर्जत पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषद यांना वेळ नाही. त्यामुळे तालुक्यातील नांदगाव, चाफेवाडी आणि ओलमण येथील आरोग्य उपकेंद्रे आजही नवीन छपराच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जत तालुक्यात 3 जून 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळ झाले होते. त्यात रायगड जिल्हा परिषदेच्या तब्बल 112शाळांचे तर तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सात आरोग्य उपकेंद्रांचे नुकसान झाले होते. मात्र सात महिने उलटून गेले तरीही छप्पर उडालेल्या तीन आरोग्य उपकेंद्रांची दुरुस्ती अद्यापही करण्यात आलेली नाही. चक्रीवादळात कर्जत तालुक्यातील खांडस प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रातील नांदगाव उपकेंद्राचे छप्पर उडून त्याचे पत्रे शेजारच्या झाडावर अडकले होते, ते अजूनही त्याच स्थितीत आहेत. डिसेंबर महिना उजाडला तरीही या उपकेंद्राची छप्पर दुरूस्ती झालेली नाही. त्यामुळे येथील वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग तसेच कर्जत पंचायत समितीचा कोणीही अधिकारी नांदगाव उपकेंद्राकडे फिरकलाच नाही, हे सिद्ध होते. याच खांडस ग्रामपंचायत हद्दीमधील चाफेवाडी येथील आरोग्य उपकेंद्रावरील जून महिन्यात उडालेले छप्पर अजूनही त्याच स्थितीत आहे. कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीमधील ओलमण येथील आरोग्य उपकेंद्रच्या इमारतीचे छप्परदेखील चक्रीवादळमध्ये उडून गेले होते. त्यामुळे त्या ठिकाणी निवासी असलेल्या आरोग्यसेविकेच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. स्थानिकांनी केलेल्या मदतीमुळे ते उपकेंद्र सुस्थितीत असले तरी या आरोग्य उपकेंद्रच्या संपुर्ण दुरूस्तीचे काम आरोग्य विभागाची यंत्रणा अद्यापही करू शकलेली नाही.