मुंबई ः प्रतिनिधी
मेट्रो कारशेडचा विषय विरोधी पक्षाने राजकीय केला असून, त्यात न्यायालयाने पडू नये अशी टीका करतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाच्या कामकाजावर संताप व्यक्त केला आहे. राऊतांनी केलेल्या या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी थेट त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
’संजय राऊत यांनी न्यायालयावर टीका करीत न्यायालयाने काय करावे असे मार्गदर्शनच ते करू लागले आहेत. हा एक प्रकारे न्यायालयावरील अविश्वास आहे असून, लोकशाहीसाठी घातक आहे. न्यायालय कोणत्याही सरकारच्या आदेशावर चालत नसते. कोर्टावर कोणताही आरोप करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळे राऊत यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची गरज आहे,’ असे दरेकर म्हणाले.
’सामना वर्तमानपत्राच्या अग्रलेखातून बेजबाबदार टीका केली तसेच नेत्यांवर आक्षेप घेतले ते आपण राजकीय टीका-टिप्पणी म्हणून समजून घेऊ, पण या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वोच्च न्यायव्यवस्था केली आहे. या न्यायव्यवस्थेच्या बाबतीत असे आक्षेप घेतले जात असतील तर यापेक्षा दुर्देव न्यायव्यवस्थेचे असू शकत नाही. त्यामुळे न्यायव्यवस्थेने दखल घेण्याची गरज आहे,’ अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …