महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. येथील बंद दूरध्वनी, पाणीटंचाई, भंगार वाहन, मोडकळीस आलेल्या कर्मचारी वसाहती अशा अनेक समस्यांना या केंद्रातील कर्मचार्यांना तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणी शासकीय खर्च होत असला तरी तो वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे. ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे रायगड जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात पाचाड, रायगडवाडी, नेवाळी, हिरकणीवाडी, पुनाडे, सांडोशी, सावरट, कोंझर, कोथुर्डे, वाळसुरे, छत्री निजामपूर आदी 34 गावे आणि 102 वाड्यांचा समावेश आहे. रायगडावर येणार्या शिवप्रेमींनादेखील या आरोग्य केंद्राचा फायदा होतो, मात्र या आरोग्य केंद्राला अनेक समस्यांनी घेरले आहे.
पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जुनी आहे. ती मोडकळीस आली आहे. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी विजेच्या वायर्स जळाल्याने भिंतीवर पडलेला काळा डाग तसाच आहे. येथील प्रसूतिगृहाचीदेखील तीच अवस्था आहे. केंद्रात रुग्णांसाठी असलेल्या खाटांची दुरवस्था झाली आहे. काही खाटा मोडकळीस आल्या आहेत.
निवासस्थानांची दुरवस्था : या केंद्रातील कर्मचार्यांना निवासस्थानांची सुविधा आहे, मात्र नव्याने बांधण्यात आलेली निवासस्थाने अवघ्या काही वर्षांतच मोडकळीस आली आहेत. त्यांचे दरवाजे तुटले असून निसर्ग चक्रीवादळात या निवासस्थानांच्या छपरांचे नुकसान झाले आहे. वेळोवेळी दुरुस्ती होत नसल्याने महिला कर्मचारी किंवा महिला डॉक्टरांना ही निवासस्थाने असुरक्षित असल्याचे डॉ. पी. एस. बेर्लेकर आणि सृष्टी शेळके यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्याची समस्या कायम : या केंद्राला ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करण्यात येतो, मात्र जानेवारी महिन्यानंतर पाचाडला पाणीटंचाई भासू लागते. सध्या या नळपाणी योजनेला आठवड्यातून एकदाच पाणी येत आहे. पाणी मिळत नसल्यामुळे दवाखान्यातील शस्त्रक्रिया करताना अडचणी निर्माण होतात.
रुग्णवाहिकेचीही बिकट अवस्था : केंद्रात असलेल्या 102 रुग्णवाहिकेचीही अवस्था बिकट झाली आहे. बंद रुग्णवाहिकेमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राला सुसज्ज वाहनाची आवश्यकता आहे.
पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी निवासस्थानांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्याकरिता जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्यात येईल. निधी प्राप्त होताच काम केले जाईल. -संजय कचरे, सदस्य, रायगड जिल्हा परिषद
पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध देखभाल दुरुस्तीबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे, मात्र निधी प्राप्त होत नसल्याने कामे रखडली आहेत. -नरेंद्र देशमुख, प्रभारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, महाड