व्यावसायिक संकटात; राज्य शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी
मोहोपाडा : प्रतिनिधी
डिसेंबर महिन्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी मालकांचा कच्चा माल भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने या आर्थिक संकटात असलेल्या वीटभट्ट्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी वीटभट्टी मालक राज्य शासनाकडे मागणी करीत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्च रोजी लॉकडाऊन झाल्यावर वीटभट्टीचा व्यवसाय बंद करावा लागला. या वेळेस वीटभट्टी मालक आर्थिक संकटात असतानासुद्धा वीटभट्टी मालकांनी पुन्हा नव्या उमेदीने एक महिन्यापूर्वी नव्याने वीटभट्टी व्यवसाय सुरू केला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी मालकांनी बनवलेला कच्चा माल भिजून लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोरोनाच्या संकटात वीटभट्टी व्यवसाय बंद करून आर्थिक संकट असताना नव्याने पुन्हा व्यवसाय सुरू केला. वीटभट्टी मालकांवर शासनाची रॉयल्टी भरण्याचा तगादा मागे असताना आता वीटभट्टी मालकांचे अवकाळी पावसामुळे कच्चा माल भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आर्थिक संकटात असलेल्या वीटभट्ट्यांच्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी वीटभट्टी मालकांची शासनाकडे मागणी होत आहे. वातावरणातील वारंवार होणार्या बदलांमुळे विविध आजार वाढले आहेत. याशिवाय वाल पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तसेच आंब्याचा मोहर गळून पडल्याने शेतकरीवर्गातही चिंतेचे वातावरण आहे.