चेन्नई ः वृत्तसंस्था
रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा सन्मानजनक धावसंख्येचा बचाव करीत सनरायझर्स हैदराबादवर 13 धावांनी विजय मिळवला. हैदराबादचा हा यंदाच्या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 5 बाद 150 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा डाव 137 धावांवर संपुष्टात आला. मुंबईच्या कायरन पोलार्डला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मुंबईच्या 151 धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी दणक्यात सुरुवात केली. या दोघांनी पॉवरप्लेदरम्यान ट्रेंट बोल्ट आणि अॅडम मिल्ने या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत संघाच्या 57 धावा फलकावर लावल्या होत्या. त्यानंतर फिरकीपटू कृणाल पांड्याने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. कृणालच्या चेंडूवर फटका खेळताना जॉनी बेअरस्टो आठव्या षटकात हिट विकेटचा शिकार ठरला. बेअरस्टोने 22 चेंडूंत चार षटकार आणि तीन चौकारांसह 43 धावा केल्या. बेअरस्टो बाद झाल्यानंतर रोहित शर्माने फिरकीपटू राहुल चहरला गोलंदाजीला बोलावले. त्याने बेअरस्टोनंतर आलेल्या मनीष पांडेला पोलार्डकरवी झेलबाद करीत हैदराबादला दुसरा धक्का दिला. पांडेला फक्त दोन धावाच करता आल्या. यानंतर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर चोरटी धाव घेताना धावबाद झाला. हार्दिक पांड्याने यष्ट्यांवर चेंडूची अचूक फेक करीत वॉर्नरला माघारी धाडले. वॉर्नरने 36 धावांची खेळी केली. मग हैदराबादच्या डावाला उतरती कळा लागली. मधल्या फळीत विजय शंकरने थोडा प्रतिकार केला, मात्र डावाच्या शेवटी तोही दबावात बाद झाला. मुंबईकडून राहुल चहरने अप्रतिम फिरकी गोलंदाजीचे प्रदर्शन करीत चार षटकांत 19 धावा देत तीन बळी घेतले. त्याच्याशिवाय बोल्टनेही तीन गडी बाद केले. तत्पूर्वी, फलंदाजीचा निर्णय घेऊन रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक यांनी मुंबईसाठी चांगली सुरुवात केली. या दोघांनी 55 धावांची भागीदारी उभारली. रोहितने आक्रमक तर क्विंटनने संयमी खेळी करीत त्याला साथ दिली. मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहित झेलबाद झाला. त्याने दोन चौकार आणि दोन षटकारांसह 32 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवलाही शंकरने तंबूचा मार्ग दाखवला. वॉर्नरने राशिद खान आणि मुजीब उर रेहमान यांना गोलंदाजीसाठी पाचारण करत मु्ंबईची धावगती रोखली. शतकाकडे कूच करताना मुंबईने डि कॉकला गमावले. तो वैयक्तिक 40 धावांवर माघारी परतला. दुसर्या बाजूला संथ खेळणारा ईशान किशनही दबावात बाद झाला. त्याने 21 चेंडूंत फक्त 12 धावा केल्या. यानंतर कायरन पोलार्डने मोर्चा सांभाळला. एकेरी, दुहेरी धावा, कधी मोठे फटके यांचे मिश्रण साधत त्याने मुंबईच्या धावसंख्येला आकार दिला. भुवनेश्वरने हैदराबादसाठी टाकलेल्या शेवटच्या षटकात पोलार्डने दोन षटकार खेचत मुंबईला दिडशे धावांचा आकडा गाठून दिला. पोलार्ड 22 चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांसह 35 धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून विजय शंकर आणि मुजीब उर रेहमान यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर खलील अहमदने एक गडी बाद केला.