अलिबाग : प्रतिनिधी – ज्ञानाच्या कक्षा रुंदावत जातील तसे नवे ज्ञान प्राप्त होईल, अनेक गोष्टींचं आकलनसुद्धा होईल. विज्ञान हे अंतिम सत्याचा कधीही दावा करत नाही. जीवनातील श्रद्धा तपासल्या पाहिजेत. माणूस विवेकशील बनण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन महत्त्वाची भूमिका बजावतो. हा वैज्ञानिक दृष्टिकोन व्यक्तिशः आणि सार्वजनिक जीवनात आचरणात आणला पाहिजे, असे मत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भौतिकशास्त्रातील ज्येष्ठ
शास्त्रज्ञ प्रा. डॉ. नरेश दधीच यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय वेबिनारमध्ये ते बोलत होते. ’गुरू शनी महायुती’ या खगोलीय घटनेच्या पार्श्वभूमीवर हा वेबिनार आयोजित केलेला होता.
गुरु, शनी महायुती हा सुंदर खगोलीय आविष्कार सर्वांनी पहावा, निरीक्षण करावे, ग्रह तार्यांचा मानवी जीवनावर कसलाच परिणाम होत नाही. खगोलीय अविष्कार निरीक्षण करून त्यातून पुढील संशोधनास चालना मिळते, मात्र ज्योतिष सांगणारे या ग्रह, तार्यांची भीती पसरवतात, फसवणूक करतात. या फसवणुकीच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती उभी राहते असे ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रा. डॉ. नितीन शिंदे यांनी सांगितले.
अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यावेळी उपस्थित होते. राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. विष्णू होनमोरे यांनी आभार मानले. राज्य सरचिटणीस नितीन राऊत, सोशल मीडियाचे राज्य कार्यवाह अवधूत कांबळे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.