रोहे : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे रोहा उपजिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील रग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्यांच्या जेवणाची गैरसोय होत आहे. त्यांची ही गैरसोय बौद्ध समाज युवा संघ रायगडने दूर केली आहे. या रुग्णालयात दाखल रुग्णांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत बौद्ध समाज युवा संघ रायगडच्या वतीने मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यासंबंधीचे पत्र रुग्णालय अधीक्षक डॉ. अंकीत खैरकर यांना दिले आहे. मोफत जेवण तयार करण्याची व्यवस्था बौद्ध समाज युवा संघ रायगडचे संस्थापक रमेश शिंदे यांच्या निवासस्थानी करण्यात आली असून त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे जेवण तयार करण्याचे काम करीत आहेत.
यासाठी बौद्ध समाज युवा संघ रायगड संस्थापक रमेश शिंदे, अध्यक्ष जितेंद्र गायकवाड, रोहा तालुका अध्यक्ष रवींद्र गायकवाड, सचिव प्रशांत जाधव, खजिनदार सुविनय अहिरे, उज्ज्वला शिंदे परिश्रम घेत आहेत.