Breaking News

अखेर जंजिरा किल्ला खुला

पर्यटकांसह स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण

मुरूड ः प्रतिनिधी
आठ महिन्यांपासून बंद असलेला जंजिरा किल्ला अखेर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. सोमवार (दि. 23)पासून येथून जलवाहतूक सुरू होणार असल्याने स्थानिक व्यावसायिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, मार्च महिन्यापासून किल्ला बंद असल्याने परिसरात झाडेझुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने सरपटणार्‍या प्राण्यांपासून पर्यटकांनी
दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
1 जून ते 31 ऑगस्ट या काळात समुद्र खवळलेला असल्याने राजपुरी ते किल्ला सुरक्षिततेच्या कारणामुळे बंद ठेवण्यात येतो, मात्र या वर्षी कोरोनामुळे हा किल्ला मार्चअखेरीस बंद करण्यात आल्याने प्रवासी वाहतूक करणार्‍या 200 कुटुंबीयांचे ऐन हंगामात उत्पन्न बुडाले. त्यामुळे त्यांना हालअपेष्टा सोसावी लागली. अनलॉकनंतर पर्यटनास परवानगी देण्यात आली होती. समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलू लागले, मात्र जंजिरा किल्ला सुरू नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असे. रायगड जिल्हाधिकार्‍यांनी आदेश निर्गमित केले असूनही महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने जलवाहतूक सुरू न केल्याने हा किल्ला बंद ठेवण्यात आला होता. परवाने नूतनीकरण व प्रवासी विमा न केल्यामुळे बोर्डाने जलवाहतूक सुरू केली नव्हती, परंतु आता जलवाहतूक सोसायटीने
या सर्व बाबींची पूर्तता केल्यामुळे मेरीटाइम बोर्डासह पुरातत्त्व खात्याकडून अटी-शर्तींच्या आधारावर जंजिरा किल्ला 23 नोव्हेंबरपासून खुला करण्यात येत आहे.

जंजिरा जलवाहतुकीस मेरीटाइम बोर्डाने परवानगी दिली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब प्रवाशांसह बोटचालकांनी केला पाहिजे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
-बी. जी. येलीकर, सहाय्यक संवर्धक, पुरातत्त्व खाते, अलिबाग-रायगड 

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply