कोकण भवन येथील उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी मुंबई : विमाका – कोकण भवन येथील दुसर्या मजल्यावर असलेल्या महिला भोजन कक्षामध्ये बुधवारी (दि. 23) या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कोकण भवन व जवळील परिसरातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीकांनी मोठया संख्येने रक्तदान करून या समाजकार्यात कर्तव्य भावनेने आपला सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अतिरीक्त आयुक्त वस्तू व सेवा कर ठाणे झोन सुमेर कुमार काळे आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, कोकण भवन राजपत्रित अधिकारी महासंघ, वस्तू व सेवा कर अधिकारी-कर्मचारी संघटना समन्वय समिती यांच्या संयुक्त सहकार्याने घेण्यात आलेले रक्तदान शिबिर राज्यात अनुकरणीय ठरेल.
या उपक्रमाचे विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी सर्वप्रथम रक्तदान करून या शिबिराला सुरुवात केली. कोरोना महामारी सोबत संपूर्ण जग लढत आहे. कोरोना व्हायरसविरुद्ध असलेले हे युद्ध जिंकण्यासाठी सर्व यंत्रणा विविध पद्धतीने प्रयत्न करत आहेत. या लढाईत कोकण विभागातील शासकीय कर्मचारी हे नेहमीच पुढे असतात. हे या शिबिराच्या आयोजनातून दिसून आले.
या रक्तदान शिबिरात आयोजकांनी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क आणि सॅनिटायझरचा योग्य वापर केला. शिबिर यशस्वी करण्यासाठी वस्तू व सेवा कर विभागाचे राज्यकर सहआयुक्त प्रदिप कडू, उपायुक्त कमलेश नागरे, डॉ.नागरगोजे, (माहिती) कोकण विभागचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे, आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक बी. एस. सोनावणे, कोकण भवनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश धुमाळ, डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा गुप्ता यांनी विशेष परिश्रम घेतले.
डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या रक्तपेढीने या उपक्रमास उस्त्फुर्त प्रतिसाद दिला. या वेळी डी. वाय. पाटील हॉस्पिटल रक्त संक्रमण अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राज्य कर अधिकारी, अश्विनी चौधरी (कोकण विभाग महिला अध्यक्षा) यांनी शिबीराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.