पाली : रामप्रहर वृत्त
तौक्ते चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात मोठे नुकसान केले आहे. आमदार रविशेठ पाटील यांनी शुक्रवारी (दि. 21) या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना लवकर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आमदार रविशेठ पाटील यांनी शुक्रवारी सुधागड तालुक्यातील दर्यागाव, पाच्छापूर व नाडसुर आदी गावांतील घरांच्या झालेल्या पडझडीसह इतर नुकसानीची पाहणी करून तेथील लोकांशी संवाद साधला. या वेळी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सुधागड तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, तालुका सरचिटणीस केतन देसाई, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष अशपाक खानदेशी, अतोणे सरपंच रोहन दगडे तसेच सुनील राऊत, मंगेश पालांडे, नंदकुमार कुडपणे यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.