संगीत, नृत्य, नाटकांची उद्या मेजवानी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष पनवेल शहर सांस्कृतिक सेलच्या वतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या शनिवारी (दि. 26) सायंकाळी 6.30 वाजता पनवेल शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ’मनोरंजन अनलॉक पनवेल’ या संगीत नृत्य आणि नाटकांची मेजवानी असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना काळानंतर पनवेलच्या रसिकप्रेक्षकांसाठी भाजपच्या वतीने ही एक मनोरंजक पर्वणी असणार आहे. शासनाने आखून दिलेल्या कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे तसेच सामाजिक अंतराचे पालन करून कार्यक्रम होणार आहे. या मनोरंजनात सीकेटी महाविद्यालय (स्वायत्त) कलादर्पण सांस्कृतिक विभाग प्रस्तुत ‘बायकोच्या नवर्याच्या बायकोचा खून’ ही धमाल विनोदी एकांकिका सादर होणार असून, सर्व पनवेलचे कलाकार संगीत, नृत्य मराठी आणि हिंदी गाण्यांची सुरेल मैफल रसिकांना भेट देणार आहेत.
या कार्यक्रमाच्या निःशुल्क प्रवेशिकांसाठी अभिषेक पटवर्धन (9029580343) किंवा गणेश जगताप (9870116964) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.