Breaking News

डब्ल्यूटीसी फायनलवर कोरोनाचे सावट

दुबई ः वृत्तसंस्था
जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार्‍या अंतिम सामन्यावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षीच्या जून महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही निर्बंध लादले होते. हेच निर्बंध आता जुलैपर्यंत लागू असणार आहेत.
डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 18 ते 22 जूनदरम्यान इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने गेल्या वर्षी सामन्यादरम्यान तटस्थ पंचांच्या जागी सामना होत असलेल्या देशाचे पंच निवडण्याची मुभा दिली होती. पंचांना एका देशातून दुसर्‍या देशात जावे लागू नये या हेतूने हा निर्णय घेण्यात आला होता. क्रिकइन्फो वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आयसीसीने कोविड संकट येताच लादलेले निर्बंध जुलैपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसी क्रिकेट समितीच्या शिफारशींना बोर्डाच्या कार्यकारी समितीने मंजुरी दिली होती. यावर आता 31 मार्च ते 1 एप्रिलदरम्यान आयसीसी बोर्डाकडून मंजुरी घेतली जाईल. त्यामुळे सामन्यात स्थानिक पंच जबाबदारी बजावतील.
गोलंदाजांच्या अडचणी वाढणार
कोरोना संकट आणि आयसीसीचे नियम कायम असल्याने खेळाडूंना चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करता येणार नाही. याचा सर्वाधिक तोटा गोलंदाजांना होईल. खेळाडूंना घामाचा वापर करता येईल. खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास सध्या अमलात असलेला नियम लागू होईल. आयसीसी लवकरच सॉफ्ट सिग्नलबद्दही महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये रंगलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत सॉफ्ट सिग्नलचा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहांनी कार्यकारी समितीकडे यावर चर्चा करण्याचा आग्रह धरला होता.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply