Breaking News

बेकायदेशीर लॅबोरेटरीजवर कारवाई करा

नवी मुंबई, पनवेल महापालिका आयुक्तांकडे मागणी

पनवेल : वार्ताहर

नवी मुंबई आणि पनवेल भागातील अनेक पॅथॉलॉजी लॅबचालक महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेकडे नोंदणीकृत नसणार्‍या व्यक्ती व मान्यताप्राप्त पॅथॉलॉजीस्टची नियुक्ती न करता पॅथॉलॉजी लॅब चालवून दररोज हजारो रुग्णांची आर्थिक लूट करत आहेत. त्यामुळे महापालिकेने अशा पॅथॉलॉजी लॅबचे आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करून अवैधरीत्या चालणार्‍या बोगस पॅथॉलॉजी लॅबवर गुन्हे दाखल करून त्यांची उपकरणे सील करावीत, अशी मागणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजीस्ट्स अ‍ॅन्ड मायक्रोबायोलॉजीस्ट्स या संघटनेने नवी मुंबई आणि पनवेल या दोन्ही महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.

रुग्णांचे रक्त व इतर आजारांशी संबंधित तपासण्या एम. डी. पॅथॉलॉजीस्ट ही पदवी असलेल्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली व्हाव्यात आणि त्यांच्याच सही-शिक्क्याने रुग्णांना त्याबाबतचे रिपोर्ट दिले जावेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत, मात्र अनेक पॅथॉलॉजी लॅबमध्ये प्रत्यक्ष एमडी पॅथॉलॉजीस्ट डॉक्टर नसताना त्यांच्या नावाने लॅबमधील इतर कर्मचार्‍यांकडून रुग्णांच्या रक्तासह इतर तपासण्या करून त्याबाबतचे रिपोर्ट दिले जात आहेत. हा प्रकार रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्याचाच प्रकार असल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथोलॉजीस्ट अ‍ॅॅन्ड मायक्रोबायोलॉजीस्ट या संघटनेचे पदाधिकारी डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.

नवी मुंबई व पनवेल भागात शेकडो पॅथॉलॉजी लॅब असून यातील अनेक पॅथॉलॉजी लॅबमध्ये पुरेसे ज्ञान नसलेल्या टेक्निशियनकडून रुग्णांच्या रक्त, लघवी व इतर तपासण्या करून तेच रिपोर्ट रुग्णांना दिले जात आहेत. पॅथॉलॉजीस्ट शिवाय लॅबोरेटरी चालवून रुग्णांना रिपोर्ट देणे म्हणजे डॉक्टरांशिवाय नर्सने हॉस्पिटल चालविण्याइतकेच गंभीर व बेकायदेशीर आहे. विशेष म्हणजे या बोगस पॅथॉलॉजी लॅबची महापालिकेकडे कुठल्याही प्रकारची नोंद नसल्याने या लॅबचालकांचा धंदा बिनबोभाटपणे सुरू आहे.

त्यामुळे बोगस डॉक्टरांवरील कारवाईबाबत जे शासन निर्णय व परिपत्रक आहेत. त्यानुसार महापालिकेने आरोग्य विभागामार्फत बोगस डॉक्टरांसह शहरातील बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅबचालकांचा शोध घेऊन त्यांच्या लॅबना टाळे ठोकून त्यांची उपकरणे सील करावीत, तसेच अशा बोगस लॅबचालकांवर बोगस वैद्यकीय व्यावसायिक म्हणून त्यांच्यावर महाराष्ट्र वैद्यकिय व्यवसाय अधिनियम कलम 33 सह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजीस्ट अ‍ॅन्ड मायक्रो बायोलॉजीस्ट या संघटनेने नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेकडे केली आहे.

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजीस्ट अ‍ॅन्ड मायक्रोबायोलॉजीस्ट या संघटनेने गेल्या चार वर्षात नवी मुंबई व पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील 7 बेकायदेशीर लॅबोरेटरी चालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत यात पनवेल-3, रबाळे-2, खारघर, कोपरखैरणे येथील प्रत्येकी-1 या 7 लॅबोरेटरीचा समावेश आहे, तसेच मुंबईतील सायन, घाटकोपर, तर वसईतील नवघर, गोंदिया, नागपूर येथील नरखेडा, परभणी आणि कराड या भागातील लॅबोरेटरीवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील काही लॅबचालकांना शिक्षासुद्धा सुनावली आहे.

Check Also

सरके चुनर… हटाव मोहीम सफल

गाणं कोणतेही का असेना ते लिहिताना, स्वरबद्ध करताना, त्यावर संगीतसाज चढवताना, त्याचे चित्रीकरण करताना, त्यावरची …

Leave a Reply