Breaking News

परदेशी नागरिकांना लुटणारी टोळी जेरबंद

खालापूर पोलिसांची कामगिरी

खालापूर : प्रतिनिधी

मेडिकल व्हिसा पासपोर्टवर भारतात आलेल्या परदेशी नागरिकांची मुंबई विमानतळावर दिशाभूल करून त्यांना लुटणार्‍या टोळीचा म्होरक्या बंड्या उर्फ महेश लोखंडे  (वय 40, रा. केगाव, ता. उरण) याच्यासह चार साथीदारांना खालापूर पोलिसांनी अटक केली आहे.

महेश लोखंडे हा काही वर्षे अमेरिकेत राहून आल्यामुळे त्याला इंग्रजीसह इतर भाषा येतात. मुंबई विमानतळावर  आलेल्या परदेशी नागरिकांना लुटण्याचा व खंडणी मागण्याचा कट करून त्याचे साथीदार सुशांत लोखंडे (वय 29, रा. वाकड, जि. पुणे), राज ठाकूर आणि सागर काळे (रा. वाकड, पुणे) यांनी रविवारी विमानतळावरून तीन इराकी नागरिकांना फसवून गाडीत बसविले. त्यानंतर महेशने आपण सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून इराकी व्यक्तींचे मोबाइल व पारपत्र ताब्यात घेतले व इतर साथीदारांच्या मदतीने इराकी नागरिकांच्या नातेवाइकांकडे फोनद्वारे खंडणीची मागणी केली.

मागणी पूर्ण होईपर्यंत परदेशी नागरिकांना गाडीमधून अनोळखी ठिकाणी फिरवण्यात येत होते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोल नाक्याच्या पाठीमागे इराकी नागरिकांना अटक करण्याची धमकी देत त्यांच्याकडून या टोळीने मोबाइल व त्यांची 600 पौंड (40 हजार रुपये) असलेली काळ्या रंगाची बॅग काढून घेतली. दरम्यान, नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. पोलीस मागावर आहेत असे समजताच मोबाइल व बॅग वॅगनर कारमध्येच टाकून चारही आरोपींनी 40 हजार रुपये घेऊन पळ काढला.

खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संजय बांगर, शेखर लव्हे, महिला उपनिरीक्षक अंबिका अंधारे, पोलीस नाईक नितीन शेडगे, हेमंत कोकाटे, सचिन वस्कुटी, पोलीस शिपाई दत्तात्रेय किसवे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी (दि. 28) पहाटे बंड्या उर्फ महेश लोखंडे याला उरण येथून, तर त्याच्या तीन साथीदारांना इतर ठिकाणांहून ताब्यात घेतले. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अनिल विभुते अधिक तपास करीत आहेत.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply