Breaking News

सिद्धगड बलिदान दिनी हुतात्म्यांना अभिवादन

कर्जत : बातमीदार
भारतीय स्वातंत्रलढ्याच्या इतिहासाचे सोनेरी पान आपल्या बलिदानाने लिहिणार्‍या हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील या भारतमातेच्या दोन सुपुत्रांना शनिवारी (दि. 2) नेरळ येथील स्मारकात अभिवादन करण्यात आले. दरम्यान, मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे होणारा बलिदान दिन कार्यक्रम कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कर्जतच्या कळंब येथून सिद्धगड येथे जाणारी मशाल नेण्यात आली नाही, परंतु कळंबमधील तरुणांनी शनिवारी गावात मशाल फेरी काढून हुतात्म्यांना अभिवादन केले.
भारतभूमी स्वतंत्र व्हावी म्हणून अनेक शूर-वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतलेले क्रांतिवीर भाई कोतवाल, हिराजी गोमाजी पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आझाद दस्ता स्थापन केला. या माध्यमातून त्यांनी भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न केले. त्यातच त्यांना 2 जानेवारी 1943 रोजी ब्रिटिशांशी लढा देत असताना वीरमरण आले. त्याची आठवण मनात ठेवून अनेक गावांतील मशाली सिद्धगडावर जात असतात. दरवर्षी कळंब गावातूनसुद्धा अशीच मशाल सिद्धगडावर जाते, परंतु कोरोना महामारीमुळे तेथील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने पंरपरा न मोडता पहाटे 6 वाजून 10 मिनिटांनी कळंब गावात क्रांतिज्योत प्रज्वलित करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. नेरळ येथील स्मारकातही प्रमुख लोकप्रतिनिधी आणि ठराविक नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply