Breaking News

औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेस-शिवसेनेत धुसफुस

सरकार तीन पक्षांचं आहे हे विसरून चालणार नाही; काँग्रेसने साधला शिवसेनेवर निशाणा

मुंबई : प्रतिनिधी

औरंगाबादच्या नामांतराचा मुद्यावरून आता काँग्रेस व शिवसेना यांच्यात धुसफुस सुरू झाल्याचे दिसत आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करणार असल्याची घोषणा शिवसेनेने वारंवार केली आहे, तर काँग्रेसने नामांतरावर विरोध दर्शविला असून काँग्रेस नेते या मुद्यावरून शिवसेनेवर निशाणा साधताना दिसत आहेत.

औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुनाच कार्यक्रम आहे. मात्र सरकार तीन पक्षांचे आहे, हे विसरून चालणार नाही. आघाडीची सरकारे किमान समान कार्यक्रमांवर चालतात. कुणाच्या वैयक्तिक कार्यक्रमावर नाही. किमान समान कार्यक्रम काम करण्यासाठी तयार केला आहे, नाव बदलण्यासाठी नाही, असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विटद्वारे शिवसेनेला सुनावले आहे.

औरंगजेबचे व्यक्तिमत्व वादग्रस्त राहिले आहे. त्याच्या प्रत्येक कृतीशी काँग्रेस सहमत असणे गरजेचे नाही. संभाजीराजे महान योद्धे होते, त्यांचा त्याग महान आहे. याबाबत काहीच मतभेद नाही. मात्र सरकार चालवत असताना शिवसेना महापुरुषांनामध्ये आणेल तर नक्कीच नुकसान होईल, स्वतः निर्णय घ्यावा, असा इशाराही संजय निरुपम यांनी शिवसेनेला दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याकडे लक्ष

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यांनी केले औरंगाबाद शहराचे नामांतर करण्यास विरोध व्यक्त केल्यानंतर काँग्रेसचे प्रमुख नेते अशोक चव्हाण यांनी ही भुमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, औरंगाबादच्या नामांतरास आमचा विरोध होता आणि यापुढेही राहील. औरंगाबादचे नामांतर हा महाविकास आघाडी सरकारच्या समान किमान कार्यक्रमाचा भाग नाही. औरंगाबादचे नामांतर हा स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, याकडेही अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधले.

Check Also

दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम करण्यासाठी आमची तळमळ -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्ततळागाळात दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षमपणे सामोरे जायला पाहिजे ही आमची तळमळ असते, …

Leave a Reply