Breaking News

खारभूमी मजबुतीकरणाची लगबग सुरू

कामे उरकण्यासाठी अधिकार्‍यांची होणार दमछाक

पेण : प्रतिनिधी

पेण तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे गडब, खारपाले, कासू भागातील खारपाले, खारढोंबी जुईअब्बास, माचेला चिर्बी तर रावे, कोपर, भाल विठ्ठलवाडी, वडखळ या खारभूमी क्षेत्रातील तब्बल 9000 एकरावर नापिकीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. यामुळे बंधार्‍याची मजबुती करण्याची कामे येत्या 25 दिवसात करण्यासाठी खारभूमी विभागाचे अधिकारी सज्ज झाले आहेत. गतवर्षी महापुरात फुटलेले समुद्र खाड्यांच्या संरक्षक बंधार्‍याची देखभाल दुरूस्ती स्थानिक ग्रामस्थांनी प्राथमिक स्वरूपात केली होती. मात्र यावर्षी मान्सून हंगामापूर्वी या खारभूमी बंधार्‍याची मजबुतीकरणाची कामे येत्या 25 दिवसात करण्यासाठी खारभूमी सर्वेक्षण अन्वेषण विभागासमोर मोठे शिवधनुष्य उचलण्याची कठीण समस्या उभी राहिलेली आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे संरक्षक बंधार्‍यांची कामे जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने करून मजबुती करण्याची कामे करण्यावर प्रशासनाचा भर राहणार असल्याचे सांगितले. पेणच्या खाडीकिनारी गावांमध्ये खारभूमी संरक्षक बंधारे फुटुन समुद्राचे पाणी व पावसाचे पाणी एकत्रित अतिवृष्टीवेळी साठून महापूर येतो. या महापुराच्या पाण्याचा प्रचंड ओघ गावांमध्ये शिरून त्या त्या गावाला पुराचा वेढा पडतो. गतवर्षी पेणमधील कणे गावातील घराला वेढा पडून पुरात अडकलेल्या 75 नागरिकांना एनडीआरएफच्या जवानांनी रेस्क्यु ऑपरेशन करून प्राण वाचविले होते. कणे खारभूमी योजनेतील पूर्व बाजूकडील बंधारे जागोजागी फुटून भोगावती नदीपात्रातील पुराच्या पाण्याचा वेढा संपूर्ण गाव व परिसरातील वाड्यांमध्ये पडला होता. महत्वाची बाब म्हणजे या बंधार्‍यावर सीआरझेडचा उल्लंघन करून बांधकाम देखील झालेले आहेत. त्यामुळे पुर्व पार असलेले बंधारे कळत न कळत खिळखिळे झाल्याने भविष्यात काम केल नाही, तर पूर्ण बंधार्‍याला खांडी जाण्याच्या शक्यता आहेत तसेच येत्या मान्सून हंगामात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात महापूर येणार असा हवामान खात्याने व इतर मान्सूनच्या अंदाज वर्तविणार्‍या वेधशाळांनी सांगितले आहे. खारभूमी बंधार्‍यांचे बळकटीकरणाची कामे जानेवारी महिन्यापासून सुरू व्हायला हवी होती. योजनेचे आराखडे बनविण्यासाठी व या योजनावर विकास निधीची तरतूद ऑनलाइन टेंडर प्रक्रियेसाठी वेळ लागतो. मार्च महिन्यापासून कोरोनाने मृत्युचे तांडव सुरू केले आहे. अशा परिस्थितीत आता मे महिना उजाडला असून मान्सुनपूर्व कामे करण्यासाठी सरकारने सवलत दिली आहे.

शेतकरी जगला, तर देश जगेल!

खारभूमी विभागातील अधिकारी वर्गाला पेण तालुक्यातील पूर्व बाजू वगळता इतर तीनही दिशांना असलेल्या खारभूमी योजनेतील कामांवर लक्ष केंद्रीत करावे लागेल. यामध्ये पेण तालुक्यातील गडब विभागातील खारपाले, जुईअब्बास चिर्बी, माचेला येथील 2800 एकर जमीन तीन वर्षे नापीक आहे. वडखळमधील 2500 एकरात वाळवंट आहे. तीच परिस्थिती वासंखाड व विठ्ठलवाडी भालमध्ये आहे. शेतकरी जगला, तर देश जगेल या विचार होणे गरजेचे आहे. नापीक शेतजमीन सुपीक करण्यासाठी खारभूमी बंधार्‍यांचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply