Breaking News

जनता सुज्ञ असल्याने विरोधकांनी श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये!

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सल्ला

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली शहराच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी व त्या संदर्भातील पाठपुरावा कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केला होता. त्या अनुषंगाने कळंबोलीतील विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. याचे सर्व श्रेय भाजपच्या लोकप्रतिनिधींचे असून जनता सुज्ञ आहे. त्यामुळे विरोधकांनी याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, असा सल्ला महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 26) कळंबोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांना दिला.
या पत्रकार परिषदेस भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक अनिल भगत, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील, भाजपचे कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, राजेंद्र शर्मा तसेच कमल कोठारी, संजय दोडके, संदीप म्हात्रे, सुनील ढेंबरे, रामा महानवर, बबलू शेख आदी उपस्थित होते.
सन 2016 साली स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेने अल्पावधीतच विकासकामांच्या दृष्टिकोनातून भरारी घेतली असून या कामी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख आणि सहकार्‍यांची सकारात्मक भूमिका उपयुक्त ठरली असल्याचे परेश ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, क्रीडा अशा विविध सुविधा महत्त्वाच्या मानून आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख व आम्ही लोकप्रतिनिधी काम करीत आहोत. सत्ताधारी म्हणून विकासकामे आणि त्यासाठी आर्थिक तजवीज करण्यासाठी नियोजन करण्याचे काम केले आहे.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना परेश ठाकूर यांनी सांगितले की, रुग्णांच्या सेवेसाठी यूपीएचसी सेंटर चांगल्या प्रकारे कार्यान्वित असून आणखी सुविधा म्हणून मोबाईल हॉस्पिटल सुरू केले जाणार आहे. 2016मध्ये महानपालिकेची स्थापना झाल्यानंतर मालमत्ता कर लागू झाला. मालमत्ता कराला पर्याय नाही, मात्र मालमत्ता करासंदर्भात विरोधी पक्षाने राजकारण केले आणि नागरिकांची दिशाभूल केली. आम्ही नागरिकांच्या विकासासाठी काम करीत आहोत. मध्यंतरी कोरोनाचा काळ सर्वांवर आघात करणारा ठरला. त्यामुळे कोरोना काळातील मालमत्ता करासंदर्भात सूट मिळावी अशी आमची आग्रही मागणी आहे आणि त्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर प्रयत्नशील आहेत. जीएसटी अनुदानासंदर्भात बोलताना त्यांनी पूर्वीच्या आयुक्तांकडून मोठ्या चुका झाल्याचे सांगितले. त्यामुळे महापालिकेला योग्य जीएसटी अनुदान मिळत नव्हते. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष घातले. त्यांनी व माजी नगरसेवक अनिल भगत यांनी पाठपुरावा केला. जीएसटीबद्दल अनेक सल्लागारांशी चर्चा केली, कोर्टात दाद मागितली, सरकारच्या विरोधात लढलो. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने तर दुर्लक्ष केले, परंतु शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर या सरकारने जीएसटीची जबाबदारी घेतली आणि या वर्षापासून जीएसटीचा योग्य अनुदान मिळायला सुरुवात झाली आणि हे अनुदान दरवर्षी 400 ते 450 कोटी रुपये असणार असून गेल्या सहा वर्षांचे 1650 कोटी रुपये जीएसटी अनुदान महानगरपालिकेला मिळणार आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात विविध सुविधांना बळ मिळणार आहे. कळंबोलीतील होल्डिंग पॉण्डमध्ये मँग्रोजची वाढ होत राहिली. त्यामुळे नाल्यांचे पाणी निचरा होण्यास अडचण निर्माण झाली. त्या अनुषंगाने डासांची उतप्ती वाढली आणि आरोग्याबाबत प्रश्न निर्माण झाले. आमचे लोकप्रतिनिधी जागरूक असल्याने त्यांनी या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला. आता धारण तलावासाठी निधी उपलब्ध झाल्याने हा प्रश्न सुटणार आहे. यापुढेही नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू, असेही परेश ठाकूर यांनी आश्वासित केले.
या वेळी माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांनी म्हटले की, पनवेल महापालिका हद्दीतील कळंबोली शहराचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. मागील 35-40 वर्षांपूर्वी सिडकोने या शहराची निर्मिती केली, पण या शहराचे झपाट्याने नागरीकरण होत असून मोठ्या प्रमाणात लोकसंख्येत वाढ होत असल्याने येथील रस्ते, ड्रेनेज लाईन, मैदाने, पाणीपुरवठा योजना, होल्डिंग पॉन्ड, नाले यांसारख्या मुलभूत सुविधा अपुर्‍या पडत असून या ठिकाणी मूलभूत सुविधांपासून नागरिकांना वंचित रहावे लागत आहे. आता या शहरातील सुविधा महापालिकेला हस्तांतरीत झाल्याने पनवेल महापालिकेमार्फत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, नव्याने ड्रेनेज लाईन टाकणे, होल्डिंग पॉन्डमधील गाळ काढणे, मैदाने विकसित करणे, नवीन पाण्याची टाकी उभारणे अशा कामांसाठी निधीची तरतूद करण्याची गरज होती. त्यामुळे या संदर्भात आम्ही कळंबोलीतील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे विनंती मागणी केली होती. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदनाद्वारे कळंबोलीच्या विकासासाठी 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करून पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने त्यांनी रस्त्यासाठी 100 कोटी रुपये आणि धारण तलावासाठी 116 कोटी 60 लाख रुपयांची अशी एकूण 216 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्याबद्दल दूरदृष्टी असलेले आमदार प्रशांत ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांचे आभार मानतो. या मागणीला मंजुरी मिळाल्यानंतर विरोधकांना पोटशूळ उठला आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

कळंबोलीतील विकासकामांसंदर्भात माजी सभागृह नेते परेश ठाकूर सकाळी 7 वाजता अधिकार्‍यांसोबत पाहणी आणि त्या अनुषंगाने आढावा घेत होते. त्यांच्या तत्परतेने अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.
-अमर पाटील, माजी स्थायी समिती सभापती, पनवेल महापालिका

Check Also

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे

माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा …

Leave a Reply