Breaking News

कोरोना लशीसंदर्भात भारतीयांना गुड न्यूज!; कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनला मान्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रभावी शस्त्र असलेली लस आता भारतातही लवकरच उपलब्ध होणार आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना देशात आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे. भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) व्ही. जी. सोमाणी यांनी रविवारी (दि. 3) पत्रकार परिषद घेऊन ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. कोविशिल्ड लस ही ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी विकसित केली आहे, तर कोव्हॅक्सिन लस हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीने तयार केली आहे. या दोन्ही लशींना केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) शनिवारीच परवानगी दिली होती. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी डीसीजीआयची प्रतीक्षा होती. या दोन्ही लशींना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाची लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येते असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आशुतोष सिन्हा यांनी केला आहे. याबाबत डीसीजीआयचे व्ही. जी. सोमाणी यांना विचारले असता, आम्ही कधीही अशा लशीला संमती देणार नाही जी नपुंसकत्व आणते. या दोन्ही लशी 100 टक्के सुरक्षित आहेत. लस घेतल्याने पुरुषांना नपुंसकत्व येते असे म्हणणे साफ चुकीचे आहे. अशा मूर्खपणाच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नये, असे सोमानी यांनी स्पष्ट केले.

लस सुरक्षित : एम्स

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी मिळाल्यानंतर काही नेत्यांकडून लशीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले, परंतु लशीच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही काळजी करण्याची गरज नसल्याचे मत ‘एम्स’चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले. कोणत्याही लसीचा विचार करताना त्याच्या सुरक्षिततेबाबत सर्वतोपरी विचार केला जातो. यासाठीच लस निरनिराळ्या टप्प्यांतून जाते. यातूनच ती लस सुरक्षित आहे याची निश्चिती केली जाते. यानंतर आपण मानवी चाचणीकडे येतो. सर्व माहिती तज्ज्ञांद्वारे पाहिली जाते आणि त्यानंतरच लसीला मंजुरी दिली जाते, असेही गुलेरिया यांनी स्पष्ट केले.

कोरोनाविरुद्धच्या लढाईतील एक निर्णायक क्षण : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. ‘जागतिक महामारीविरोधात भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण. या मंजुरीमुळे स्वस्थ आणि कोविडमुक्त भारताच्या मोहिमेस बळ मिळेल. या मोहिमेसाठी जीव तोडून प्रयत्न करीत असलेल्या शास्त्रज्ञ-नवनिर्मात्यांना शुभेच्छा व देशवासीयांचे अभिनंदन,’ अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटले की, ही अभिमानाची बाब आहे की ज्या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी संमती दिली गेली आहे, त्या दोन्ही लशी मेड इन इंडिया आहेत. हे आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी शास्त्रज्ञांची इच्छाशक्ती दर्शवते. कठीण परिस्थितीमध्ये असाधारण सेवाभावासाठी आणि देशवासीयांचे जीवन वाचवण्यासाठी आम्ही डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, शास्त्रज्ञ, पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि सर्व कोरोना योद्ध्यांचे सदैव आभारी राहू, असेही पंतप्रधानांनी म्हटलेय.

नव्या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! लस संकलनासाठी सीरम इन्स्टिट्यूटने पत्करलेल्या सर्व जोखीमांनांतर अखेर यश मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, बिल गेट्स यांच्यासह संबंधित संस्थांचे आभार! -अदर पुनावाला, सीईओ, सीरम इन्स्टिट्यूट

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply