नाराजांना गोंजारण्याचे प्रयत्न सुरू
अलिबाग : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोंडींना वेग आला आहे. इतर पक्षातील नाराजांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना आपल्या पक्षात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आता खर्या अर्थाने राजकीय वातावरण तापू लागले आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने विद्यमान खासदार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेेसने सुनिल तटकरे यांना उमदेवारी दिली आहे. या दोन्ही नेत्यांनी विरोधी पक्षातील नाराजांना आपल्याकडे वळविण्यावर भर दिला आहे. अलिबागचे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर सुनिल तटकरे यांच्यावर नाराज आहेत. हे माहित असल्यामुळे गिते यांनी काही दिवसांपूर्वी मधुकर ठाकूर यांच्या सातिर्जे येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तर धुळवडीच्या दिवशी सुनिल तटकरे यांनी मधुकर ठाकूर यांची अलिबाग येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मनधरणी केली.
अनंत गिते यांनीदेखील तटकरेंना शह देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले यांची भेट घतली. नाविद अंतुले शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बॅ. अंतुले यांना मानणारा एक मोठा वर्ग रायगड जिल्ह्यात आहे. नाविद शिवसेनेत आल्यास बॅ. अंतुले यांना मानणारा वर्ग आपल्याला मदत करील, असे अनंत गिते यांना वाटत आहे. रायगडात 28 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी गाठीभेटी घेतल्या जात आहेत. त्यामुळे हळूहळू रायगडातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
गिते 28 मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरणार
शिवसेनेचे उमेदवार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते 28 मार्च रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे या वेळी उपस्थित राहणार आहेत.
नविद अंतुले शिवसेनेच्या वाटेवर, अनंत गिते यांची घेतली भेट
अलिबाग : प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नविद अंतुले शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. नुकतीच त्यांनी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे रायगडमधील उमेदवार अनंत गीते यांची महाड येथे भेट घेतली.
दरम्यान, नविद हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेऊन मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र नवीद अंतुले यांनी शुक्रवारी (दि. 22) मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेना प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले.
नाविद अंतुले हे मागील वर्षभरापासून रायगडच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात ते फिरत आहेत. या मतदारसंघातील काँग्रेसचे कार्यकर्त्यांशी ते संपर्कात होते. मात्र मागील काही दिवसांपासून स्थानिक पातळीवरील निवडणुकांच्या निमित्ताने नविद यांचा शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संपर्क वाढला आहे. आता ते शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मन:स्थितीत आहेत. नाविद अंतुले यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीत नेमके काय घडले, काय चर्चा झाली याचा तपशील मिळू शकला नाही. मात्र ते लवकरच भगवा खांद्यावर घेतील अशी अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीत नाविद अंतुले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढू शकतात.
अलिबाग काँग्रेसची आज विशेष बैठक
अलिबाग : प्रतिनिधी
राजकारणात कोणीच कोणचा कायमचा शत्रू नसतो. तात्विक मतभेदांतून निर्माण झालेली दरी केव्हाही संपुष्टात येऊ शकते. त्याला काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर आणि राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे हे देखील अपवाद नाहीत. गुरूवारी झालेल्या या दोघांच्या भेटीने चर्चा आणि तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यामुळे शनिवारी (दि. 23) होणारी अलिबाग काँग्रेस कार्यकर्त्यांची विशेष बैठक लक्ष्यवेधी ठरली आहे. या बैठकीतील निर्णयाकडे आघाडीचे लक्ष लागले आहे.
2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुनिल तटकरे आणि मधुकर ठाकूर यांच्यात प्रचंड दुरावा निर्माण झाला. मधुकर ठाकूर यांनी तटकरे यांच्या विरोधात घेतलेली भुमिका आणि केलेल्या वक्तव्यातून मतभेदाचा अंदाज येत होता. तटकरे यांनी गुरूवारी मधुकर ठाकूर यांची भेट घेतली. प्रदीर्घ चर्चेअंती मधुकर ठाकूर यांनी कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतरच आपली भुमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शनिवारी (23 मार्च)अलिबाग काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकार्यांची विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे. आता या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत.