Breaking News

चिरले ग्रामपंचायतीच्या सरपंच, माजी उपसरपंच आणि ग्रामसेविकेची चौकशी करा

कोकण उपायुक्तांचे रायगड जिल्हा परिषदेला आदेश

उरण : रामप्रहर वृत्त

उरण तालुक्यातील चिरले ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियांका दीपक मढवी, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य निवृत्ती धनाजी पाटील आणि ग्रामसेविका आसावरी रंजीत कदम यांनी संगनमत करून बेकायदेशीर बांधकामाला अभय दिल्याप्रकरणी त्यांच्या चौकशीचे आदेश कोकण विभागीय उपायुक्त (आस्थापना) यांनी रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांना दिले आहेत. याबाबत गणेश जयराम पाटील यांनी तक्रार केली होती. त्याचप्रमाणे सरपंचबाईंचे पती दीपक मढवी हे पत्नीच्या पदाचा गैरवापर करीत असल्याचाही तक्रारदार पाटील यांचा आरोप आहे.

चिरले येथील गणेश पाटील यांनी त्यांच्या ताबेकब्जातील वहिवाटीमध्ये सन्मान जयराम पाटील व जयराम भाऊ पाटील यांनी अतिक्रमण करून रहदारीचा पूर्वापार असलेला मार्ग बंद केला म्हणून 24 डिसेंबर 2019 रोजी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार केली होती. अतिक्रमणास अटकाव करावा, अशी त्यांची मागणी होती. दरम्यान, बेकायदेशीर बांधकामाची तक्रार केली म्हणून सन्मान व जयराम यांनी गणेश यांना शिवीगाळ केली व अतिक्रमण तसेच ठेवले. त्यामुळे गणेश यांनी त्याच दिवशी ग्रामपंचायतीकडे पुन्हा लेखी तक्रार अर्ज केला. त्यावर आम्ही कारवाई करून अतिक्रमण त्वरित थांबवून रहदारीचा रस्ता मोकळा करू, असे त्यांना सांगण्यात आले, मात्र कारवाई झालेली नाही. त्यानंतर अर्जदाराने ग्रामपंचायतीमध्ये कारवाईसाठी वेळोवेळी फेर्‍या मारल्या, मात्र ग्रामपंचायतीने आज करू, उद्या करू, असे सांगून कारवाईत चालढकलपणा केला. अर्जदाराने 2 मार्च 2020 रोजी स्मरणपत्र दिले. तेव्हा दोन दिवसांत कारवाई करू, असे ग्रामपंचायतीने सांगितले, मात्र कारवाई काही झालेली नाही.  

अर्जदार गणेश पाटील 3 डिसेंबर 2020 रोजी ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा विचारणा करण्यासाठी गेले असता त्या वेळी सरपंच प्रियांका मढवी यांनी माझे पती दीपक मढवी आलेले आहेत. तुम्ही त्यांना विचारा, असे सांगितले. पाटील यांनी विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच तुला करायचे ते कर. पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये येऊ नको. नाही तर तुला खोट्या केसमध्ये अडकवेन, अशी धमकी दिली.

अशा प्रकारे चिरले ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियांका दीपक मढवी, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य निवृत्ती धनाजी पाटील आणि ग्रामसेविका आसावरी रंजीत कदम यांनी संगनमत करून पैशांच्या हव्यासापोटी मला न्यायापासून वंचित ठेवले व अप्रत्यक्षरीत्या सन्मान पाटील व जयराम पाटील यांच्या बेकायदेशीर बांधकामास सहकार्य करून माझ्या ताबा वहिवाटीतील तीन फूट जागेत अतिक्रमण करून रहदारीचा मार्गच बंद केला. म्हणून माझ्या कुटुंबास त्रास सहन करावा लागतो, तसेच सरपंच प्रियांका मढवी यांचे पती दीपक मढवी हे सरपंच नसतानाही सरपंच पत्नीच्या पदाचा गैरवापर करीत असल्याचे दिसून येते. पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल सरपंच, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य आणि ग्रामसेविका यांचे पद काढून घेण्यात यावे, अशी मागणी गणेश पाटील यांनी कोकण उपायुक्तांकडे केली होती. त्यानुसार त्यांनी या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.

दरम्यान, या संदर्भात तक्रारदार गणेश पाटील यांनी ग्रामपंचायत अधिनियम 1958चे कलम 39(1) प्रमाणे न्यायालयातही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे दोषींवर दुहेरी कारवाईची टांगती तलवार आहे.

सरपंचबाईंचा पती पाहतोय ग्रामपंचायतीचा बेकायदा कारभार चिरले ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून प्रियांका दीपक मढवी या पदावर असताना प्रत्यक्षात मात्र ग्रामपंचायतीचा सारा कारभार त्यांचे पती दीपक रामचंद्र मढवी हे बेकायदेशीरपणे पाहत आहेत. त्यामुळे सरपंच प्रियांका मढवी ह्या रबरी शिक्का उरल्या असून, त्यांच्या पदाचा पतीकडून दुरुपयोग होत असल्याचा गणेश पाटील यांचा आरोप आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply