पनवेल : प्रतिनिधी
समाजात घडणार्या सकारात्मक आणि आदर्शवत गोष्टींना प्रसिद्धी देऊन प्रोत्साहन देण्याचे कार्य करणार्या आणि त्याचबरोबर कोरोना संकटकाळात जीवावर उदार होऊन रस्त्यावर उतरून सलग वृत्तसंकलन व छायाचित्रण करणार्या पत्रकार व छायाचित्रकारांचा कामोठे येथील दिशा महिला मंचने मंगळवारी (दि. 5) पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला. यामध्ये ‘राम प्रहर’चे पत्रकार नितीन देशमुख यांनाही गौरविण्यात आले.
आगरी समाज हॉलमध्ये झालेल्या पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यास संपादक राहुल गडपाले, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी डॉ. रजत जाधव, डॉ. श्रुणाल जाधव, ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, रूद्र ग्रुपचे मोहन झा आदी उपस्थित होते
या राहुल गाडपाले यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करून दिशा महिला मंचच्या कार्याचे कौतुक केले. दिशा महिला मंचच्या अध्यक्ष नीलम आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हिरकणी विद्या मोहिते, खुशी सावर्डेकर, रेखा ठाकूर, उषा डुकरे, सुरेखा आडे, सारिका माळी, स्वप्नाली दोशी, कविता पाखरे, शिल्पा चौधरी, योजना दिवटे यांच्या अथक प्रयत्नाने हा उपक्रम मोठ्या उत्साहात झाला.
‘दिशा’चे कार्य कौतुकास्पद : डॉ. कविता चौतमोल
दरवेळी वेगळा विषय घेऊन दिशा महिला मंच कार्य करीत असते. आज समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाचे कार्य करणार्या, ऊन-वार्याची पर्वा न करता घटनास्थळावर जाऊन वृत्तांकन करणार्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सन्मान सोहळा आयोजित करून मंचने चांगला आदर्श घालून दिला. याबद्दल नीलम आंधळे आणि त्यांच्या सहकार्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे गौरवोद्गार महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी काढले.
समाजात काय घडते हे दाखवण्याचे काम पत्रकार करतातच, पण अंदमानात असताना स्वांत्र्यवीर सावरकर यांनी मराठी भाषा शुद्ध आणि समृद्ध करण्याचे काम केले. आज त्यांचेच कार्य पत्रकार पुढे नेऊन आपली मराठी भाषा टिकवण्याचे कामही करीत आहेत. त्यामुळे पत्रकारांना स्वांत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने पुरस्कार देणे आवश्यक आहे.
-परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल महापालिका