Breaking News

24 जूनला सिडको घेराव आंदोलन होणारच!

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती सज्ज

पनवेल : प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्यात यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने ‘दिबां’च्या स्मृतिदिनी म्हणजेच 24 जूनला सिडकोला घेराव आंदोलन होणारच. आमचा धडक मोर्चा काही हजारोंच्या संख्येने असणार असल्याने राज्य सरकारला त्याची नोंद घ्यावीच लागेल, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला.
‘दिबां’च्या स्मृतिदिनी होणार्‍या आंदोलनाची माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील सभागृहात शुक्रवारी (दि. 17) पत्रकार परिषद घेण्यात आली. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील होते.
याचबरोबर उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, सहचिटणीस गुलाब वझे, राजेश गायकर, संतोष केणे, सुरेश पाटील, दीपक म्हात्रे, खजिनदार जे. डी. तांडेल, दीपक पाटील, विनोद म्हात्रे, गोपीनाथ म्हात्रे, अरुण पाटील, दशरथ भगत, डॉ. राजेश पाटील, उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक विकास घरत तसेच नंदू ठाकूर, शैलेश घाग, विनोद म्हात्रे, सीमा घरत आदी उपस्थित होते.
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने गेल्या वर्षी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्यात यासाठी 24 जूनला आंदोलन केले होते. त्या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सिडकोच्या कार्यालयाजवळ जाऊ न देता नवी मुंबई महापालिकेजवळ मोर्चा अडवला होता. त्यानंतरही आमच्या मागण्या मंजूर केल्या गेल्या नाहीत. सिडकोने केलेला ठराव रद्द केला नाही. जोपर्यंत विधिमंडळात लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील, असा निर्धार या वेळी समितीच्या नेत्यांनी व्यक्त केला. या वेळी कॉँग्रेसच्या नेत्यांनी दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आणि त्यांनी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितल्याने याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
पोलिसांनी आंदोलकांना मागील आंदोलनाबाबत आता वर्षाने नोटिसा दिल्या आहेत. त्याला आम्ही घाबरत नाही. आमचे आंदोलन सुरूच राहील. कितीही नोटिसा दिल्या तरी थांबणार नाही, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, गुलाब वझे, जे. डी. तांडेल यांनीही आपली भूमिका मांडली. कल्याण व ठाण्याहून आलेल्या कार्यकर्त्यांनीही आम्ही आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्यात यासाठी समिती स्थापन झाली त्या वेळी आमच्यासोबत असलेले काही नेते प्रकल्पग्रस्तांचा साडेबारा टक्के व गावठाणाचा प्रश्न सोडवला असे सांगतात. तसे झाले असेल तर चांगलेच आहे, पण त्याबाबत कोणताही पुरावा देत नाहीत. त्यामुळे आम्ही सिडकोवर 24 तारखेला धडक मोर्चा हजारोंच्या संख्येने नेणारच. आता हे आंदोलन पेटणार.
-लोकनेते रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष,सर्वपक्षीय कृती समिती

आम्ही 24 तारखेला आंदोलन करणारच असा आमच्या बैठकीत निर्णय झाला आहे. मागच्या वेळी आम्हाला पोलिसांनी नवी मुंबई महापालिकेच्या कार्यालयाजवळ अडवले. पुढे जाऊन दिले नाही. या वेळी आम्ही बेलापूर गावातून मोर्चाने धडकणार आहोत. त्याची तयारी सुरू आहे. अनेक गावांत बैठका सुरू आहेत. या वेळीही हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत.
-आमदार प्रशांत ठाकूर, कार्याध्यक्ष, सर्वपक्षीय कृती समिती

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply