Breaking News

कर्जत वारे येथे बेसुमार जंगलतोड

साग आणि खैरासारख्या मौल्यवान झाडांची कत्तल

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील वारे भागातील जंगलात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. किमान 15 एकर जागेतील जुनी झाडे तोडण्यात येत असून वन विभागाने परवानगी दिली असल्याचे झाडे तोडणार्‍या स्थानिक कामगारांनी सांगितले आहे, मात्र मौल्यवान समजल्या जाणार्‍या खैर आणि साग जातीच्या झाडांचीही मोठ्या प्रमाणात तोड झाली असताना वनविभाग सुस्त असल्याचे दिसून आले आहे.

वारे गावाच्या हद्दीत देवपाडा रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणात वनसंपदा टिकून होती. या भागातील घनदाट जंगलातून रात्रीच्या यायला वाहनचालक कचरतात, मात्र वारे गावातील शेतकर्‍यांची मालकी आणि राखून ठेवलेले जंगल सध्या तोडले जात आहे. किमान 15 एकर परिसरातील म्हणजे वारे-देवपाडा रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगलातील झाडे तोडण्यात येत आहेत. त्यात प्रामुख्याने साग आणि खैर या जातीच्या झाडांचा समावेश आहे.

याबाबत स्थानिक कामगारांना माहिती विचारली असता, त्यांनी वनविभागाने परवानगी दिली आहे, असे उत्तर दिले, मात्र सागाची झाडे तोडायला परवानगी दिली आहे काय? याचे उत्तर कामगारांनी दिले नाही. दुसरीकडे कर्जत वन विभागाच्या सुगवे वनक्षेत्रामधील वनपालांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, तेथे वन विभागाचे कोणीही कर्मचारी हजर नव्हते. दरम्यान, वन विभागाने टाकाऊ झाडे तोडण्यास परवानगी दिली असल्याचे बोलले जात असून जंगलतोड करणारे मात्र सरसकट जागेत उपलब्ध असलेली झाडे तोडून टाकत आहेत.

साग आणि खैर यासारख्या मौल्यवान झाडांच्या लाकडांना बाजारात मोठ्या प्रमाणात किंमत असल्याने, जंगलतोड करणार्‍या ठेकेदारांचा या झाडांवर डोळा असतो आणि वारे येथेदेखील तसाच प्रकार सुरू आहे, परंतु वनविभाग त्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत असून, त्या विभागाचे कर्मचारी जंगलतोडीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देत नाहीत. त्यामुळे वारे येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेली जंगलतोड बेकायदा असल्याचा संशय निर्माण होत आहे.

वारे येथे जळाऊ लाकडांची तोड करण्याची परवानगी देण्यात आली आहे, अन्य प्रकारची झाडे तोडली जात असतील, तर त्याची चौकशी केली जाईल.

-हरेश वारे, वनपाल, सुगवे, ता. कर्जत

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply