कर्जत : बातमीदार
चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हिंदू नववर्षाचे स्वागत नेरळ गावात दरवर्षी मोठ्या जल्लोषात केले जाते. यंदाही नेरळ नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे शनिवारी (दि. 6) नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे गेल्या 15 वर्षापासून नेरळ गावात स्वागतयात्रा काढून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या वर्षीही शनिवारी काढण्यात येणार्या स्वागत यात्रेमध्ये वारकरी संप्रदाय, प्रजापिता ब्रह्मकुमारी, नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व महिला मंडळ नेरळ या निरनिराळ्या संस्थांचा आपापल्या चित्ररथासह सहभाग असणार आहे. या शोभायात्रेला ‘सर्वस्व वाद्य पथकाचा’ नादमय साज चढणार असून, घोडे, उंट व बैलगाडी यांनी स्वागत यात्रा चांगलीच रंगणार आहे. वेगवेगळ्या वेशभूषा व पारंपरिक वेशभूषेतील महिला या वर्षीच्या स्वागतयात्रेचे विशेष आकर्षण असणार असून, नेरळ चिंचआळी येथील दत्त मंदिर येथून या यात्रेस प्रारंभ होऊन श्रीराम मंदिर येथे या यात्रेची सांगता होणार आहे.