एमजीपीच्या कार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन; बेमुदत उपोषण मागे
कर्जत : बातमीदार
माथेरान पाणीपुरवठा योजनेतील पाणी अन्य कोणालाही दिले जाणार नाही, असे पत्र जीवन प्राधिकरणाचे पनवेल येथील कार्यकारी अभियंत्यांनी दिल्याने मनसे पदाधिकार्यांनी आपले बेमुदत उपोषण तिसर्या दिवशी शनिवारी (दि. 9) रात्री मागे घेतले.
माथेरानसाठी येथील शारलोट तलाव तसेच नेरळ कुंभे येथे उल्हास नदीवर पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. या पाण्याचे नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) करते. मात्र एमजेपीच्या काही अधिकार्यांनी या योजनेतील जुम्मापट्टी येथील पंपिंग स्टेशनमधून नेरळ येथील सर्वात उच्चभ्रू व मोठ्या सोसायटीला परस्पर पाणी दिले. त्यामुळे गेले काही दिवस नेरळ कुंभे येथील योजनेतून माथेरानला पाणी पुरवठा होत नाही. दरम्यान, शारलोट तलावातून आताच पाणी उपसा झाला तर एप्रिल-मे महिन्यात माथेरानमधील पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे. माथेरानकरांचे हक्काचे पाणी नेरळ येथील उच्चभ्रू वस्तीला देण्यात आले, या विरोधात मनसेचे माथेरान शहराध्यक्ष संतोष कदम आणि अन्य पदाधिकार्यांनी येथील श्रीराम चौकात बेमुदत उपोषण सुरु केले होते. त्यांच्या या आंदोलनास भारतीय जनता पार्टीसह सर्व राजकिय पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र कोणताही शासकीय अधिकारी गेल्या दोन दिवसात उपोषण स्थळी फिरकला नव्हता. दरम्यान, मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी माथेरानचा पाणीप्रश्न मिटला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यााचा इशारा थेट राज्याच्या पाणीपुरवठा मंत्र्यांना दिला. त्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. नेरळ येथील उच्चभ्रू व मोठ्या सोसायटीला बेकायदेशीररित्या देण्यात आलेली पाणी जोडणी काढून टाकण्याचे आदेश जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले. व माथेरानचे हक्काचे पाणी अन्य कोणालाही दिले जाणार नाही, असे पत्र देवून आंदोलनकर्त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देवून मनसेचे माथेरान शहराध्यक्ष संतोष कदम आणि अन्य पदाधिकार्यांनी शनिवारी रात्री आपले बेमुदत उपोषण सोडले. या वेळी माथेरानमधील सर्वपक्षीय कार्यकर्तेव नागरिक उपस्थित होते.