Breaking News

पनवेल बस आगाराच्या नुतनीकरणास लवकरात लवकर सुरुवात करा

  • आमदार प्रशांत ठाकूर यांची परिवहनमंत्र्यांकडे मागणी
  • काम सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा

पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल येथील बस आगाराच्या नुतनीकरणाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे तसेच हे काम सुरू न केल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य परिवहन महामंडळाचे अतिशय महत्त्वाचे मानले जाणारे पनवेल येथील बस आगाराच्या नुतनीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून बराच कालावधी होऊन अद्यापपर्यंत कामाला सुरुवात झालेली नाही. अतिशय दयनीय अवस्थेत असलेले पनवेल बस आगार अनेक प्राथमिक पायाभूत सुविधांपासून वंचित असल्याने प्रवाशांना व नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. कोविड-19 पूर्वी तसेच कोविड- 19च्या काळात जवळपास दोन वर्षे बस आगाराच्या नुतनीकरणाचे काम सुरू होऊ शकले नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु सद्यस्थितीत सर्वच व्यवहार व विकासकामे सुरू असून पनवेल बस आगाराच्या नूतनीकरणाचे काम सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे.
बस आगाराच्या नूतनीकरणाच्या कामासंदर्भात लोकप्रतिनिधी म्हणून मी वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करूनसुद्धा संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे बस आगाराचे नूतनीकरणाचे काम अद्यापही प्रलंबित आहे.
नागरिकांची व प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता पनवेल बस आगाराच्या नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे; अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यास आपण भाग पाडाल व या आंदोलनातून उद्भवणार्‍या परिस्थितीस प्रशासन जबाबदार असेल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply