Breaking News

राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव

परभणीतील मृत कोंबड्यांच्या अहवालातून स्पष्ट

मुंबई : प्रतिनिधी
देशातील इतर राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. परभणी जिल्ह्यात 800 कोंबड्यांचा झालेला मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला असल्याचे प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुंगळीकर यांनी याबाबत माहिती दिली.
देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातलेले असतानाच परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात एकाच दिवशी 800 कोंबड्या मरण पावल्याची घटना घडली. ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये ही घटना घडली तो बचत गटाच्या वतीने चालवला जातो. या पोल्ट्री फॉर्ममध्ये आठ हजार हजार कोंबड्या असून, त्यापैकी 800 कोंबड्या मरण पावल्या आहेत.
कोंबड्या मरण पावल्याची घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यातून या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. मुरूंबा परिसरातील एक किलोमीटर अंतरातील सर्व कोंबड्या तसेच पाळीव पक्षी नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले असून, 10 किमी अंतरातील कोंबड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय गावातल्या लोकांचीसुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.
खारघरमध्ये कावळे, साळुंख्या मृतावस्थेत
खारघरमध्ये रेल्वेस्थानक तसेच भारती विद्यापीठ परिसरात काही कावळे आणि साळुंख्या मृत अवस्थेत आढळल्या आहेत, तर नांदेडच्या हिमायतनगरमध्ये शेकडो मधमाशा मृतावस्थेत आढळल्या आहेत. यामागे बर्ड फ्लूची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
‘त्या’ अहवालांची प्रतीक्षा
बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे रविवारी 26 कावळे मृतावस्थेत आढळले. यापैकी तीन कावळ्यांचे अवशेष भोपाळला, तर अन्य काही नमुने पुण्याला पाठविण्यात आले आहेत. मुंबईच्या चेंबूरमधील टाटा कॉलनीजवळही नऊ कावळे मृतावस्थेत आढळले. पालिका कर्मचार्‍यांनी मृत कावळ्यांचे नमूने तपासणीसाठी पाठवले. तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply