सुगड पूजन परंपरेतून कुंभार समाजाच्या हाताला काम
पेण : अनिस मनियार
शहरासह संपूर्ण पेण तालुक्यात सध्या मकर संक्रांतीच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. संक्रांतीसाठी लागणारी सुगडी बनवण्याच्या कामाने वेग घेतला आहे. भारतीय सण, परंपरेमुळे कुंभार समाजाचा सुगडी बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय टिकून आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी वाणाला अधिक महत्त्व आहे. तीळगूळ घ्या.. गोड गोड बोला.. असा संदेश देत समोरच्या प्रति प्रेम, आपुलकी, आदर व्यक्त करण्याची संधी या सणाच्या माध्यमातून मिळते. महिलांसाठी हा विशेष सण समजला जातो. या दिवशी सुवासिनी एकमेकींना वाण देतात. हे वाण देण्यासाठी ज्या मातीच्या भांड्यांचा वापर केला जातो त्याला सुगड म्हणून संबोधले जाते. त्यामुळे वाण घेण्यासाठी छोटे खण (सुगडी) 20 ते 30 रुपयांना पेणमध्ये उपलब्ध आहे.
सुगडासाठी लागणारी तांबडमाती, भट्टीसाठी लागणारी लाकडाची मोळी त्याचबरोबर सुगडासाठी लागणारी खास तूसाची राख विकत आणावी लागत असल्याने सुगडाच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती व्यवसायिकांनी दिली.
पेणमधील कुंभार आळी येथे मोठ्या प्रमाणात सुगडी बनविण्याचे काम सुरु आहे. दिवसाला साधारण शंभर सुगडी तयार करीत असून संक्रातीला तीन हजार सुगडांची विक्री होत असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले. पेण, खोपोली,
पनवेल परिसरातून घाऊक विक्रेतेसुध्दा येथे विक्री करण्यास पेणमध्ये येत असतात.
ऐन उन्हाळ्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे माठ विक्रीला मोठा फटका बसला होता. परंतु नव्या वर्षात कोरोनाचे कमी झालेल्या सावटामूळे कुंभार समाज हळूहळू सावरत आहे. प्रगतीच्या वाटेवर जात असताना मातीपासून तयार होणार्या वस्तूंच्या किमती मात्र जशाच्यातशा आहेत. माती कामात प्रचंड मेहनत आहे. मात्र योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत विक्रेते व्यक्त करीत आहेत.