Breaking News

बर्ड फ्लू : रायगड जिल्ह्यातही सतर्कता

अलिबाग : प्रतिनिधी

सध्या तरी रायगड जिल्ह्यात कुठेही पक्षी अथवा कोंबड्यांचे संशयास्पद मृत्यू झाल्याची बाब समोर आली नाही. अजून तरी रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला नाही. तरीदेखील खबरदारी घेतली जात आहे. रायगड जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रत्येक तालुक्यात शीघ्र प्रतिसाद दलाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के यांनी दिली.

रायगड जिल्हा हा पोल्ट्री व्यवसायात अग्रेसर आहे. जिल्ह्यात जवळपास तीन हजार पोल्ट्री फार्म असून, तेथे दर महिन्याला 60 लाख पक्षी तयार होतात. पुणे, नाशिक जिल्ह्यानंतर पोल्ट्री फार्मच्या व्यवसायात रायगड जिल्ह्याचा नंबर लागतो. त्यामुळे विशेष काळजी घेतली जात आहे.

रायगड जिल्ह्यात अद्याप तरी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे वृत्त नाही, मात्र खबरदारी म्हणून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. पोल्ट्रीतील पक्ष्यांना लस देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, तसेच मृत पक्ष्यांची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. पक्ष्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यास सुरुवात झाली आहे.

प्रत्येक तालुक्यात शीघ्र प्रतिसाद दलाची स्थापना करण्यात आली आहे. पोल्ट्री फार्मवर जर पक्षी अनैसर्गिक पद्धतीने मृत होत असल्याचे आढळले तर त्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तसेच भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेत पाठवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक पोल्ट्री फार्मवर वेळेवर लसीकरण व फवारणी होते किंवा नाही यावरदेखील या पथकाचे लक्ष असेल. आपल्या घरातील पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण होऊ नये यासाठी स्थलांतरित पक्ष्यांच्या किंवा त्यांच्या विष्ठेच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्या. त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवा. पोल्ट्री व्यावसायिकांनीदेखील घाबरून न जाता आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी. पक्ष्यांना वेळोवेळी औषधोपचार, लसीकरणाबरोबरच स्वच्छता राखावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

सध्या तरी जिल्ह्यात कुठेही पक्षी अथवा कोंबड्यांचे संशयास्पद मृत्यू झाल्याची बाब समोर आली नाही. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रत्येक तालुक्यात शीघ्र कृती पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. पोल्ट्री आणि पक्ष्यांचे दैनंदिन सर्वेक्षण सुरू आहे. नागरिकांनी अंडी आणि मांस चांगले शिजवून खावे. पक्ष्यांच्या आरोग्याबाबत शंका आल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.

-सुभाष म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, रायगड

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply