Breaking News

उडत येणारे संकट

महाराष्ट्रासह एकूण 10 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचे संकट घोंघावू लागले आहे. जागोजागी पक्षी मरून पडल्याच्या घटना ऐकू येऊ लागल्या आहेत. अनेक ठिकाणी कावळे, कबुतरे आणि बदके अचानक मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे. आता हे पक्षी नेमके बर्ड फ्लूमुळेच मेले की अन्य कुठल्या कारणाने याचा तपास करावा लागेल. परंतु परभणीजवळील एका गावामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्या बर्ड फ्लूमुळेच मेल्याचे भोपाळ येथील प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहे. परिणामी, महाराष्ट्रातील पशुआरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कोरोना विषाणूच्या थैमानामुळे अवघ्या जनजीवनाचे कंबरडे मोडून गेले. कोरोनाची साथ हळूहळू ओसरताना दिसते आहे. तसेच गेले वर्षभर विस्कटून गेलेले जनजीवनही रुळावर येऊ लागले आहे. येत्या शनिवारपासून जगातील सर्वात मोठी लसीकरणाची मोहीम भारतभर राबवली जाईल. एकंदरीत पाहता कोरोनाचे संकट आपण सर्वांनी कसेबसे का होईना काहिसे दूर पिटाळले आहे असे म्हणायला हरकत नाही. अर्थात अजुनही धोका टळलेला नाही. कोरोना विषाणूसारखा घातक विषाणू अजुनही डोके वर काढू शकतो याचे भान ठेवलेले बरे. त्यामुळे मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि दो गज की दूरी राखणे हे नियम आणखी काही काळ आपल्याला पाळावेच लागणार आहेत. कोरोनाचे संकट थोडेफार सौम्य झाल्याची जाणीव होत असतानाच आणखी एक भयंकर संकट दार ठोठावू लागले आहे. हे संकट आहे बर्ड फ्लूचे. एव्हियन एन्फ्लुएन्झा या नावाने शास्त्रीय जगतामध्ये कुप्रसिद्ध असलेल्या या रोगाला पक्षीगण बळी पडतात. तसेच या आजारी पक्ष्यांच्या सान्निध्यात आलेल्या मानवांनादेखील त्रास होऊ शकतो, असे दिसून आले आहे. बर्ड फ्लूची लागण झालेले तब्बल 60 टक्के रुग्ण वाचू शकत नाहीत असे इतिहास सांगतो. सामान्यत: कोंबड्यांचा बळी अधिक प्रमाणात बर्ड फ्लूमुळे जातो हे लक्षात घेता सध्या याबाबत आपण सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. येत्या काही काळात काही लाख कोंबड्यांची कत्तल करण्याचा प्रसंग कोंबडीपालन केंद्र चालवणार्‍या पोल्ट्री चालकांवर ओढवला आहे. बर्ड फ्लूच्या भीतीमुळे कोंबड्या आणि अंडी यांचे दर दिवसेंदिवस घसरताना दिसत आहेत. वास्तविक स्वच्छ ठिकाणी विकत घेतलेली कोंबडी वा अंडी अर्धा-एक तास व्यवस्थित उकळून खाल्ली तर काही बिघडणार नाही. परंतु साथरोगाचे भय अनेक अफवा आणि गैरसमजांना नेहमीच पोषक ठरते. कोरोनाची साथ सुरू झाली तेव्हाही अशाच प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या हे लोक विसरले नसतीलच. त्याही वेळेला कोंबड्या आणि अंड्यांचे दर अचानक घसरून पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला होता. वास्तविक योग्य पद्धतीने व काळजीपूर्वक शिजवलेली कोंबडी अथवा अंडी ज्यांना शक्य होईल त्यांनी खायलाच हवी. कारण साथरोगाच्या काळामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रथिनांची गरज आपल्याला असतेच. त्यामुळे अज्ञानापोटी कोंबड्या व अंडी खाणे बंद करणे योग्य होणार नाही असा निर्वाळा डॉक्टर मंडळीही देत आहेत. बर्ड फ्लू हा स्थलांतरित पक्ष्यांमुळे भारतात आला की हवामानातील बदलामुळे हे शास्त्रज्ञ शोधून काढतील. परंतु तोवर डोळसपणे वागून या संकटाशी सामना करणे एवढेच आपल्या हातात आहे. कोरोनाचा पाडाव जसा केला तसाच बर्ड फ्लूदेखील आपण परतवू यात शंका नाही.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply