Breaking News

पनवेल इंडस्ट्रियल इस्टेटच्या उद्योग श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा

पनवेल : वार्ताहर

पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट आवारात असणार्‍या गणपती मंदिर स्थापनेला 51 वर्षे पूर्ण झाली आहेत. उद्योग श्री या नावाने येथील गणपतीबाप्पा ओळखले जातात. या मंदिरात नव्या रूपातील गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

दोन दिवसांच्या धार्मिक विधीनंतर महाप्रसादाने या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता झाली. पाषाणात घडवलेल्या सुबक गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिर सगळ्यांना दर्शनासाठी खुले झाले आहे. मंदिर विश्वस्त कमिटीचे तथा पनवेल इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन विजय लोखंडे यांनी या सोहळ्याबाबत प्रस्तुत प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली.

ते म्हणाले की, 1970 साली याठिकाणी उद्योजकांना भूखंड प्रदान केल्यानंतर हा भूखंड स्मशानालगत असल्याकारणामुळे अनेक उद्योजक येथे व्यवसाय थाटण्यास राजी नव्हते. त्यावेळी चेअरमन असणारे माझे वडील रामचंद्र लोखंडे यांनी उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी आणि धार्मिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने येथे एका खांबावर गणेश मंदिराची निर्मिती केली. या मंदिर निर्मितीला 51 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजमितीला या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये 90 कारखाने कार्यरत आहेत. येथील 30 टक्के कारखाने पनवेलकरांच्या मालकीचे आहेत. उद्योगश्री नावाने प्रचलित असणार्‍या या गणपतीच्या आगमनाने येथील उद्योग वाढीस लागले. अर्थातच त्यामुळे पनवेलकरांना हक्काचे रोजगार उपलब्ध झाले.

लोखंडे पुढे म्हणाले की, संगमरवरात घडवलेल्या मूर्तीची क्षती झाली असल्याकारणाने, नव्या रूपातील श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा ही काळाची गरज बनली होती. नव्या रूपातील मूर्ती ही पाषाणात घडविलेली असून मंदिर जीर्णोद्धार व नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. या गणपतीच्या अस्तित्वाने येथील उद्योग, उद्योजक, कामगार या सार्‍यांनाच प्रेरणा मिळत असते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मुसलमान, ख्रिश्चन, जैन, शीख अशा नानाविध धर्मांतील आमचे सदस्य उद्योग श्री गणेश सेवेसाठी आपापले योगदान देत असतात.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply