Breaking News

देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; कोविड योद्ध्यांना प्राधान्य -पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

बहुप्रतीक्षित कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ शनिवारी (दि. 16) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या वेळी पंतप्रधानांनी देशवासीयांचे अभिनंदन करून कोरोना योद्ध्यांना लसीसाठी प्राधान्यक्रम असेल, असे स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतातील लसीकरण अभियान मानवीय आणि महत्त्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे ज्याला सगळ्यात जास्त गरज आहे, त्याला सर्वांत आधी लस दिली जाईल. ज्याला कोरोना होण्याचा धोका सर्वाधिक आहे, त्या व्यक्तींना सर्वांत आधी लस मिळेल. आपले डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांना सगळ्यात आधी लस दिली जाईल. या सगळ्यांचा कोरोना लशीवर पहिला हक्क आहे. त्यानंतर अत्यावश्यक सेवा आणि कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असणार्‍या लोकांना लस दिली जाईल. इतिहासात इतक्या व्यापक स्वरूपातील लसीकरण यापूर्वी कधीही झाले नाही. जगात 100पेक्षा अधिक देश असे आहेत की ज्यांची लोकसंख्या तीन कोटींपेक्षा कमी आहे, तर दुसरीकडे भारतात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. मी सगळ्यांना आठवण करून देतो की कोरोना लशीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. पहिल्या आणि दुसर्‍या डोसमध्ये एका महिन्याचे अंतर असेल. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी आपल्या शरीरात कोरोना प्रतिबंधात्मक शक्ती निर्माण होईल. त्यामुळे लसीकरण होताच तुम्ही बेजबाबदारपणे वागायला लागलात, मास्क काढून ठेवलात, सुरक्षित अंतर ठेवणे विसरलात, तर काहीही उपयोग होणार नाही. मी विनंती करतो की असे करू नका, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी समस्त नागरिकांना केले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी दुसर्‍या टप्प्यातील लसीकरणाची माहिती दिली. पहिल्या टप्प्यात तीन कोटी कोविड योद्ध्यांना लस देण्यात येईल. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना दुसर्‍या टप्प्यात लस दिली जाईल. तुम्ही कल्पना करू शकता की 30 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले चीन, अमेरिका आणि भारत असे फक्त तीनच देश आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

…अन् पंतप्रधान मोदी गहिवरले

देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, सामान्यतः आजारपणात पूर्ण कुटुंबच आजारी व्यक्तीसाठी एकत्र येते, पण कोरोनाने रुग्णालयात एकटे करून टाकले. अनेक ठिकाणी छोट्या बालकांना आईपासून दूर राहावे लागले. आई त्रस्त व्हायची, रडायची, पण काही करू शकत नव्हती. मुलाला कुशीत घेऊ शकत नव्हती. वयोवृद्ध पालक रुग्णालयात एकटेच संघर्ष करीत होते. मुले इच्छा असूनही जवळ जाऊ शकत नव्हती. जे आपल्याला सोडून गेले त्यांना परंपरेनुसार तो निरोपही मिळाला नाही ज्याचे ते हकदार होते, असे बोलताना पंतप्रधान मोदींना गहिवरून आले.

अफवांना बळी पडू नका!

पंतप्रधान मोदी यांनी सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करीत विरोधकांना अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला. ते म्हणाले, आपल्या शास्त्रज्ञांना आणि तज्ज्ञांना जेव्हा मेड इन इंडिया लशीच्या सुरक्षा आणि परिणामकारकतेबद्दल खात्री झाली तेव्हाच त्यांनी या लशींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. त्यामुळे देशवासीयांनी कोणत्याही भूलथापा, अफवा आणि चुकीच्या प्रचारापासून सावध राहावे. भारतातील लसनिर्मिती करणारे शास्त्रज्ञ, आपली वैद्यकीय प्रणाली आणि भारतातील प्रक्रियेवर संपूर्ण जगाला विश्वास आहे, असे सांगत मोदींनी लशींच्या सुरक्षिततेबद्दल भारतीयांना आश्वस्त केले.

मी आज अत्यंत आनंदी व समाधानी आहे. आपण मागील वर्षभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात कोरोनाच्या विरोधात लढाई लढत आहोत. कोरोनाविरोधातील लढ्यात ही लस संजीवनी म्हणून काम करेल.

डॉ. हर्ष वर्धन, केंद्रीय आरोग्यमंत्री

अलिबाग : शासनाच्या सूचनेप्रमाणे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना प्रथम लस टोचण्यात आली. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अलिबाग, पेण येथे प्रत्येकी एक आणि पनवेल येथील दोन अशा चार केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. (सविस्तर वृत्त पान 5 वर..)

पनवेल : येथील महापालिका हद्दीत राबविण्यात येणार्‍या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते झाला. पनवेलमध्ये जवळपास दोन हजार लशी दाखल झाल्या असून, या लशी कामोठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्टोरेज करण्यात आल्या आहेत. सर्वप्रथम 200 आरोग्य कर्मचार्‍यांना ही लस दिली जाणार आहे. (सविस्तर वृत्त पान 3 वर..)

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply