कळंबोली : बातमीदार, पनवेल : वार्ताहर
आदर्श शिक्षक वडील कै. गजानन गणू खारपाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पत्रकार मिलिंद खारपाटील यांनी वावर्ले शाळेला 4400 रुपये किमतीची 17 अनमोल पुस्तके भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. ते स्वतः पुस्तक प्रेमी असून त्याने अनेक ग्रंथालयांना आतापर्यंत एक लाखापेक्षाही जास्त किमतीची पुस्तके भेट दिली आहेत. वाचून झालेले पुस्तक घरात राहण्यापेक्षा ग्रंथालयाला दिले तर किमान 100 वाचक वाचू शकतील, अन 21व्या शतकातही वाचक प्रेमींची भूक भागवली जाईल. या हेतूने त्यांनी ग्रंथालयांना भेट घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. वाचाल तर वाचाल हा मोलाचा संदेश ते स्वतः त आचरणात आणून गेल्या पाच वर्षांत त्यांनी एक लाखाहून आधिक किमतीची पुस्तके विविध ग्रंथालयाला दिली आहेत. यामध्ये चिरनेरचे सेकंडरी स्कूल, पनवेलचे के. गो. लिमये वाचनालय, पोलादपूरचे तालुका वाचनालय, साने गुरुजी वाचनालय शांतीवन, दापोलीचे संत गजानन महाराज वाचनालय, पनवेलचे न्यू इंग्लिश स्कूल यांचा समावेश आहे. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या वेळी वावर्ले शाळेतील शीतलकुमार म्हात्रे, दरेकर आदी शिक्षक उपस्थित होते.